होमपेज › Kolhapur › राजर्षी शाहू समाधीस्थळाचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे

राजर्षी शाहू समाधीस्थळाचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 06 2018 12:37AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूरचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, या मागणीचे निवेदन शाहूप्रेमींच्या वतीने मनपा प्रशासनाला देण्यात आले. 

भारत वर्षाच्या इतिहासात देशाच्या सर्वांगीण उन्‍नतीच्या द‍ृष्टीने आपल्या आयुष्याची उभी हयात खर्ची घालणार्‍या काही मोजक्या समाज सुधारकांमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. राजर्षी शाहूंनी दूरद‍ृष्टीने देशातील गोरगरीब बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. राजर्षी शाहूंनी राबविलेल्या विविध योजनांमुळेच आज कोल्हापूर सुजलाम-सुफलाम आहे.

राजर्षी शाहूंच्या इच्छेनुसार त्यांची समाधी नर्सरी बागेतील शिवछत्रपती आणि ताराराणी यांच्या स्मारकजवळ बांधण्यात आली आहे. समाधीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच समाधी स्थळाचे लोकार्पणही होईल. हे करताना राजर्षी शाहूंच्या कार्यकर्तृत्वास न्याय मिळावा. याकरिता त्यांच्या तोलामोलाच्या व्यक्‍तीची निवड करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिष्टमंडळात मोडी अभ्यासक अमित आडसुळे, इतिहास अभ्यासक राम यादव, रविराज कदम आदींचा समावेश होता.