Sat, Jul 20, 2019 02:11होमपेज › Kolhapur › भाजपबरोबर सत्तेत सामील होण्यासाठी राजर्षी शाहू आघाडीचा हिरवा कंदील 

भाजपबरोबर सत्तेत सामील होण्यासाठी राजर्षी शाहू आघाडीचा हिरवा कंदील 

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 17 2017 12:33AM

बुकमार्क करा

इचलकरंजी : वार्ताहर

इचलकरंजी नगरपालिकेत सत्तारूढ भाजप आघाडीबरोबर सत्तेत सामिल होण्यासाठी विरोधी राजर्षी शाहू आघाडीने हिरवा कंदील दाखवल्याचे वृत्त आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विशेष समित्यांच्या नव्या फॉर्म्युलावर चर्चेचे घोडे अडल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर वरिष्ठ नेत्यांच्या संमतीनंतरच येत्या आठवडाभरात  पालिकेतील नव्या राजकीय समिकरणांवर शिक्कामोर्तब होणार आहे. तसे झाल्यास भाजप  आघाडीला बळ मिळणार असून काँग्रेस एकाकी पडणार आहे. 

पालिका निवडणुकीपूर्वी सत्ता स्थापन करताना भाजपने ताराराणी आघाडी व राष्ट्रवादी आघाडीला सोबत घेतले. सध्या पालिकेत भाजपचे नगराध्यक्षांसह 17 इतके संख्याबळ तर ताराराणी आघाडीचे 13 सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 सदस्य आहेत. तर विरोधी काँग्रेसचे 19 सदस्य असून शाहू आघाडीचे 11 सदस्य आहेत. येत्या 21 डिसेंबर रोजी पालिकेच्या विषय समित्यांच्या मुदती संपणार आहेत.

विषय समिती निवडीमुळे पालिकेत नव्या घडामोडींना वेग आला आहे. विरोध कमी करण्यासाठी शाहू आघाडीला गळ घातली होती. त्युनसार चर्चेच्या फेर्‍याही पार पडल्या. सत्तेत सामिल होण्यासाठी शाहू आघाडीने हिरवा कंदील दाखवला असला तरी विषय समित्यांच्या फॉर्म्युलावर चर्चा अंतिम टप्प्यात आहेे. सध्या पलिकेतील बांधकाम व पाणी पुरवठा विभाग राष्ट्रवादीकडे आहे तर उपनगराध्यक्ष पद ताराराणी आघाडीकडे आहे. भाजपकडे आरोग्य, महिला व बालकल्याण व शिक्षण खाते आहे. सत्तेत सामिल होण्यासाठी भाजप आघाडीकडून उपनगराध्यक्ष पदाची ऑफर शाहू आघाडीला मिळाली आहे.

मात्र बांधकाम, पाणी पुरवठा, आरोग्य खाते मिळावे यासाठी शाहू आघाडी आग्रही आहे. पालिकेतील काही प्रमुख पदाधिकार्‍यांची आज बैठक झाली. पालिकेत झालेल्या बैठकीत ताराराणी आघाडीचे प्रमुख सागर चाळके, भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार, रविंद्र माने, शाहू आघाडीचे विठ्ठल चोपडे, उदसिंग पाटील आदींची चर्चा झाली. शाहू आघाडीला सत्तेत सामवून घेण्यास भाजपसह ताराराणी आघाडीनेही संमती दर्शविली आहे. शाहू आघाडीकडून आ. हसन मुश्रीफ, ए. वाय. पाटील यांची भेट घेण्यात येणार आहे. यानंतरच पालिकेतील नव्या समिकरणांचा उदय होणार आहे.

शाहू आघाडी-काँग्रेसमधील वादाचा परिणाम

काँग्रेसबरोबर शाहू आघाडीने पालिका निवडणूक लढवली होती. गेल्या वर्षभरापासून शाहू आघाडी व काँग्रेस विरोधी भूमिका बजावत आहेत. शाहू आघाडीने सत्तेत सामिल होण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून काँग्रेसच्या पक्षप्रतोदांसह प्रमुख पदाधिकार्‍यांनी शाहू आघाडीकडून भाजप आघाडीबरोबर   सत्तेत जाणार असल्याचे सांगितले आहे. शाहू आघाडी-काँग्रेसमधील वादामुळे पालिकेत नव्या आघाडीची शक्यता आहे.