Wed, Jul 24, 2019 12:50होमपेज › Kolhapur › राजाराम बंधार्‍यावरून वाहतूक धोक्याचीच

राजाराम बंधार्‍यावरून वाहतूक धोक्याचीच

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 11:35PMकोल्हापूर : प्रतिनिधी

राजाराम बंधारा अरुंद व अवजड वाहतुकीसाठी अयोग्य असल्याने त्या बंधार्‍यावरून होणारी सरसकट वाहतूक धोकादायक आहे. त्यामुळे शिवाजी पुलाच्या संरक्षक कठड्याची दुरुस्ती त्वरित करून वाहतूक पूर्ववत सुरू करावी, अशी सूचना असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

असोसिएशनच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवाजी  पुलावरील वाहतूक थांबवून पर्यायी मार्ग म्हणून राजाराम बंधार्‍यावरून सर्व वाहतूक वळवण्यात आलेली आहे. तथापि, राजाराम बंधार्‍याची रचना ही हलक्या व मध्यम वजनाच्या वाहतुकीसाठीच केली आहे. त्यावरून अवजड वाहनांसह सरसकट होणार्‍या वाहतुकीच्या अतिरिक्‍त भारामुळे बंधार्‍यास धोका पोहोचू शकतो. तसेच एखाद्या मोठी दुर्घटनाही घडू शकते.

शासनाच्या वतीने शिवाजी पुलाची पावसाळ्यापूर्वी तपासणी केली असता पुलाला कोणताही धोका नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. हा पूल दगडी बांधकामातील आहे. त्याचा संरक्षक कठडा हा दगडी बांधकामाचाच होता. झालेली दुर्घटना ही कठड्यालाच धडक लागल्याने व कठडा तुटून टेम्पो ट्रॅव्हलर नदीत कोसळल्याने झालेली आहे. त्याचा पुलाच्या कमकुवत असण्याशी कोणताही तांत्रिक संबंध नाही. तरी प्राथमिक स्वरूपात शिवाजी पुलावरील संरक्षक कठड्याचे दुरुस्तीचे काम प्राधान्याने जलदगतीने पूर्ण करून वाहतूक पूर्ववत करावी. कठड्याच्या बांधकामाला वारसास्थळाचे मूळ स्वरूप नंतर देण्यात यावे. परंतु, सध्या शिवाजी पुलावरील वाहतूक सुरळीत करून राजाराम बंधार्‍यावरील पर्यायी वाहतूक थांबवणे आवश्यक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष आर्किटेक्ट सुधीर राऊत यांनी निवेदन सादर केले. यावेळी माजी अध्यक्ष रविकिशोर माने व इतर पदाधिकारी सुनील मांजरेकर, बाजीराव भोसले, मिलिंद नाईक, सुधीर हंजे, परशराम रेमानीचे, महेश ढवळे, सुधीर पाटील, अजय कोराणे, अतुल शिंदे, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.