Mon, Mar 18, 2019 19:33होमपेज › Kolhapur › विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव

विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 1:31AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी
कोल्हापूर संस्थानात 1939 साली विमानतळ उभारून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करणार्‍या छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव कोल्हापूर विमानतळाला देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराज यांचे नाव देण्याची केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे कोल्हापूरच्या जनतेची मागणी पूर्ण होणार आहे. 

कोल्हापूर विमानतळाच्या निर्मितीतील छत्रपती राजाराम महाराज यांचे योगदान लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात दोन्ही सभागृहात या ठरावाला मान्यता घेऊन तो केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे.

सध्या कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत असून छोट्या शहरांना राज्याच्या राजधानीशी हवाई सेवेने जोडण्याच्या ‘उडान’ या योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. त्यासाठी आखण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात कोल्हापूरचा समावेशही करण्यात आला आहे.