Mon, Jun 24, 2019 21:41होमपेज › Kolhapur › पावसाचा जोर कमी; पूरस्थिती कायम

पावसाचा जोर कमी; पूरस्थिती कायम

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 20 2018 12:53AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा जोर कमी राहिला तरीही पूरस्थिती कायम होती. पंचगंगेची पातळी सकाळी कमी होण्यास सुरुवात झाली. मात्र, सायंकाळपासून पातळी स्थिर आहे. पंचगंगा अद्याप धोक्याच्या पातळीवरच असल्याने कोल्हापूर-पन्हाळा मार्ग आजही बंदच राहिला. इचलकरंजी, शिरोळ परिसरात पंचगंगेची पातळी वाढू लागल्याने आज आणखी 100 लोकांना स्थलांतरित करण्यात आले.

जिल्ह्यात आज पुन्हा पावसाने हजेरी लावली. काही भागांत जोरदार पाऊस झाला. मात्र, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी राहिला. दोन दिवसांपासून पाऊस कमी झाल्याने पंचगंगेच्या पातळीला उतार सुरू झाला आहे. बुधवारी रात्रीपासून आज सकाळी 11 वाजेपर्यंत पातळी 44.5 फुटांपर्यंत स्थिर होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पातळी 44 फुटांपर्यंत कमी झाली. यामुळे ती वेगाने कमी होईल, अशी शक्यता होती. मात्र, सायंकाळनंतर ती रात्रीपर्यंत 44 फुटांवर स्थिर होती.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील पाणी पातळी कमी होऊ लागल्याने काही मार्ग खुले होत आहेत. आज शाळी नदीवरील चारही बंधार्‍यांवरील पाणी उतरल्याने त्यावरील वाहतूक सुरू झाली. यासह ताम्रपर्णी नदीवरील एक, घटप्रभा नदीवरील तीन, तर हिरण्यकेशी नदीवरील सहा असे 14 बंधारे खुले झाले. अद्याप 68 बंधार्‍यांवर पाणी असल्याने त्यावरील वाहतूक बंदच आहे. पन्हाळा, करवीर तालुक्यातील अनेक ठिकाणची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. मात्र, पाणी पूर्ण न ओसरल्याने संपर्क तुटलेल्या गावांत ‘जैसे थे’ अशीच परिस्थिती आहे.

कोल्हापूर-गगनबावडा मार्ग खुला झाला असला तरी आज सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेतच त्यावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली. यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला. या मार्गालगत पाणी असल्याने कोणत्याही क्षणी पुन्हा पाणी वाढू शकते, यामुळे प्रशासनाने या मार्गावरून दिवसा वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पंचगंगा अद्याप धोक्याच्या पातळीवर असल्याने शिवाजी पूल वाहतुकीसाठी आजही बंदच होता. कोल्हापूर-विशाळगड मार्गावर आज सकाळी केंबुर्णीवाडीजवळ दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद राहिली. दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.शिरोळ, हातकणंगले तालुक्यात पंचगंगेच्या पातळी स्थिर राहिली. रूई येथील आणखी 60 लोकांना आज स्थलांतरित करण्यात आले. इंगळी येथील 13 कुटुंबांतील सुमारे 50 लोकांनाही स्थलांतरित करण्यात आले. 

आपत्कालीन यंत्रणेच्या वतीने विविध गावांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. शहरात व्हीनस कॉर्नर, बापट कॅम्प आदी परिसरात आजही पाणी होते.आज राधानगरी धरण परिसरात दमदार पाऊस झाला. यामुळे धरणातील पाणी पातळी आणखी वाढली. धरण आज सायंकाळपर्यंत 97 टक्के भरले असून, धरणात 8.12 टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर राहिला, तर धरणाचे स्वयंचलित दरवाजे दोन दिवसांत उघडण्याची शक्यता आहे. तुळशी धरण 90 टक्के भरले आहे. चंदगड तालुक्यातील 1.19 टी.एम.सी.क्षमतेचे जंगमहट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरत आले आहे. वारणा धरणासह कासारी, कुंभी, कडवी धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 17.69 मि.मी. पाऊस झाला. गगनबावड्यात 50.50 मि.मी. पाऊस झाला. शाहूवाडीत 38 मि.मी., आजर्‍यात 24 मि.मी. पाऊस झाला. धरण क्षेत्रांतही पावसाचा जोर कमी आला. सहा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली.