Tue, Mar 19, 2019 05:23होमपेज › Kolhapur › पावसाचा जोर वाढला

पावसाचा जोर वाढला

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 29 2018 12:48AMकोल्हापूर : प्रतिनिधी

बुधवारी घेतलेल्या विश्रांतीनंतर गुरुवारी दुपारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला. शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात दुपारनंतर पावसाची संततधार सुरू होती. जिल्ह्यातील 11 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. गेल्या 24 तासांत सहा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली.

बुधवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. गुरुवारी सकाळपासून शहर आणि परिसरात कडकडीत ऊन पडले होते. पावसाने पुन्हा विश्रांती घेतली, अशीच परिस्थिती दुपारपर्यंत होती. मात्र, त्यानंतर शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू झाली. शहर आणि परिसरात थांबूनथांबून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. काहीकाळ तर मुसळधार पाऊस झाला. या जोरदार पावसाने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. सकाळपासून उघडीप असल्याने रेनकोट, छत्रीविना घराबाहेर पडणार्‍याचे दुपारनंतर हाल झाले.

जिल्ह्यातही दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. बहुतांशी भागात दमदार पाऊस झाला. पावसाने पुन्हा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. पंचगंगेची पातळी दिवसभर 21 फुटांवर स्थिर होती. पंचगंगेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील राशिवडे बंधार्‍यावरील पाणी उतरले. मात्र, पंचगंगेवरील सात, भोगावतीवरील तीन व कासारी नदीवरील एक बंधारा अद्याप पाण्याखाली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 13 मि.मी.पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावड्यात 47 मि.मी. इतका नोंदवला गेला. जिल्ह्यातील सहा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. पाटगाव धरण परिसरात 200 मि.मी.पावसाची नोंद झाली. घटप्रभा आणि कासारी धरण परिसरात 100 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला. कुंभी, कोदे व जांबरे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टी झाली.