Tue, Jun 25, 2019 13:34होमपेज › Kolhapur › पावसाचा कहर; महापुराची भीती

पावसाचा कहर; महापुराची भीती

Published On: Jul 17 2018 1:34AM | Last Updated: Jul 17 2018 12:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात सोमवारी पावसाने कहर केला. सर्वत्र सुरू असलेल्या धुवाँधार पावसाने धरण, नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने महापुराची भीती आहे. 

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मांडुकलीजवळ पाणी आल्याने त्यावरील कोकणातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरही केर्लीनजीक पाणी आले आहे, त्यावरीलही वाहतूक बंद करण्यात येणार आहे. शिवाजी पुलावरील वाहतूक बंद करण्याबाबतही विचार सुरू आहे. जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली गेले असून, सुमारे 200 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे.शहरासह जिल्ह्यात सकाळपासून दमदार पाऊस सुरू आहे. दुपारी काहीशी पावसाने उघडीप घेतली, काही काळ सूर्यदर्शनही झाले. त्यानंतर मात्र पावसाची संततधार सुरू होती. जोरदार पावसाने शहराच्या अनेक भागात पाणी साचले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली.

जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू होता. धरण परिसरात तर पावसाचा जोर प्रचंड होता. पावसाने नदी आणि धरणांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. कुंभी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मांडुकलीजवळ रस्त्यावर पाणी आले. सकाळी दहाच्या सुमारास आलेल्या या पाण्याची पातळी वाढत गेल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वाहतूक प्रशासनाने बंद केली. यामुळे कोकणात जाणारी वाहतूक फोंडा व आंबा घाटमार्गे वळवण्यात आली.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर दुपारी केर्लीनजीक पाणी आले. या पाण्याचीही पातळी वाढत गेली. सायंकाळी जिल्हा प्रशासनाने या मार्गाची पाहणी केली. यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने रात्री हा मार्ग बंद करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला पत्र दिले. त्यानुसार रात्री उशिरा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या मार्गावरील वाहतूक केर्ली, जोतिबा, दाणेवाडीमार्गे वळवण्यात आली. कसबा बावडा-शिये मार्गावरही पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. हे पाणी वाढले तर हा मार्गही बंद होण्याची शक्यता आहे.

पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात एक फुटाने वाढ झाली. पंचगंगेची पातळी सकाळी आठ वाजता 39.8 फुटावर होती. रात्री आठ वाजता ती 40.9 फुटांपर्यंत वाढत गेली. पंचगंगेचे पाणी शहरात जामदार क्‍लबजवळ आले असून, ते पुढे सरकत आहे. पावसाचा जोर आणि धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे पंचगंगेची पातळी वाढत असून, यामुळे महापुराचा धोका वाढला आहे. पंचगंगेने इशारा पातळी गाठली असून, ती सध्या धोक्याच्या पातळीकडे (43 फूट) जात आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर दोन दिवसांत पंचगंगा धोक्याची पातळीही गाठण्याची शक्यता आहे.पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे चालल्याने शिवाजी पूल बंद करण्याबाबत विचार सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गाने याबाबत पत्र पाठवले आहे. त्यावर जिल्हा प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. पाणी पातळी वाढत गेली, तर मात्र बुधवारपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद होण्याचीही शक्यता आहे.

जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सुमारे 200 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. गगनबावडा तालुक्यातील टेकवाडी या गावाचा पूर्ण संपर्क तुटला आहे. या गावाला चारही बाजूने पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून, त्याला बेटाचे स्वरूप आले आहे. लाकडी नावेद्वारे नागरिकांची ये-जा सुरू आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर कळे येथेही पाणी येण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने यांत्रिकी बोट सज्ज ठेवली आहे. पन्हाळा तालुक्यातील गोठे पुलावर असलेल्या पाण्याने गोठे, गोटमवाडी, तांदूळवाडी, पणुत्रे, हरपवडे, आकुर्डे, आंबर्डे व निवाचीवाडी या गावांचा पूर्ण संपर्क तुटला आहे.

बीड धरणावर पाणी आले आहे. सडोली-बाचणी या मार्गावरही पाणी आले आहे. सांगरूळ जवळही पाण्याची पातळी वाढत चालली असून, पावसाचा जोर वाढला तर करवीर तालुक्यातील मांडरे, आरळे. गोतेवाडी, गणेशवाडी, सावरवाडी, म्हारूळ, आमशी, बोलोली, उपवडे आदी 12 वाड्या 35 गावांचा पूर्ण संपर्क तुटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 8 राज्यमार्ग, 14 प्रमुख जिल्हा मार्ग, 5 ग्रामीण मार्ग तर 14 इतर मार्ग असे 41 मार्ग बाधित झाले असून, अनेक ठिकाणी त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पावसाने धरणांच्या पाणी पातळीत वाढ सुरू आहे. राधानगरी धरण आज दुपारी 4 वाजता 84.42 टक्के भरले. वारणा धरण 84.22 टक्के भरल्याने त्यातील विसर्ग वाढवण्यात आला. धरणातून सध्या 11 हजार 930 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणा नदीच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. कडवी धरण आज दुपारी पूर्ण क्षमतेने भरले असून, जिल्ह्यातील धरणातहही 75 टक्क्यांपेक्षा अधिक साठा झाला आहे. यामुळे पावसाचा जोर कायम राहिला, तर जिल्ह्यातील बुहतांशी धरणे येत्या तीन-चार दिवसांत पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. पावसाची संततधार राहिली आणि धरणे भरली, तर जिल्ह्यातील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे. पंचगंगेवरील राजाराम बंधार्‍यावरून 57 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 99.17 टी.एम.सी. इतके भरलेल्या अलमट्टी धरणातून 25 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग वाढला, तर जिल्ह्यातील परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

अनेक प्रवासी मार्गावर अडकले

कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद झाल्याने अनेक प्रवासी ठिकठिकाणी अडकून पडले. पोलिसांनी गगनबावडा आणि कळे या ठिकाणी बॅरिकेटिंग लावून वाहतूक रोखल्याने प्रवासी खोळंबले; पण त्यांची गैरसोय झाली नाही. करूळ आणि फोंडा घाटात पावसासह धुक्याचेही प्रमाण अधिक असल्याने काही प्रवाशांनी रात्री प्रवास करण्याचे टाळले. काही जण गगनबावडा, फोंडा, वैभववाडी आदी ठिकाणी थांबून होते.

लिशा हॉटेलजवळील नागरिकांना बाहेर काढले

लिशा हॉटेलजवळील यशवंत कॉलनीत घरात पाणी शिरल्याने अडकलेल्या नागरिकांना अग्‍निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. जनता बझारजवळील माणिक चेंबर, महावीर गार्डन येथे पार्किंग बेसमेंट व राजहंस प्रेसमध्ये शिरलेले पाणीही काढून देण्यात आले. राजारामपुरी, लाईन बाजार, सबजेल येथे पडलेली झाडे जवानांनी बाजूला केली. पंचगंगेत वाहून गेलेल्या तरुणांसाठी दिवसभर शोधमोहीम घेण्यात आली.