Fri, Apr 19, 2019 12:27होमपेज › Kolhapur › पाऊस दमदार... दूध आंदोलन जोरदार

पाऊस दमदार... दूध आंदोलन जोरदार

Published On: Jul 17 2018 1:34AM | Last Updated: Jul 16 2018 11:12PMभुदरगड, आजर्‍यात अतिवृष्टी; लाखोंचे नुकसान

कोल्हापूर : जिल्ह्यात धरण परिसरात धुवाँधार पाऊस सुरू आहे. पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. कडवी धरण सोमवारी दुपारी 2 वाजता पूर्ण क्षमतेने भरले. वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ सुरू आहे. जिल्ह्यातील आठ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भुदरगड, आजरा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, लाखोंचे नुकसान झाले.

कडवी धरण भरले; वारणेचा विसर्ग वाढवला

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. आजही पावसाचा जोर कायम आहे. पावसाने धरणांतील पाण्याची पातळी वाढत आहे. पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने धरणांतील पाण्याचा विसर्गही वाढवण्यात येत आहे. वारणा धरणातून सकाळी वीजनिर्मितीसाठी 775 क्युसेक, तर दरवाजातून 4,782 क्युसेक असा 5 हजार 557 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. सकाळपासून धरणपरिसरात सुरू असलेल्या पावसाने पाणीसाठ्यात वाढ होत चालल्याने धरणातील विसर्ग वाढवण्यात आला. दरवाजे आणखी वर घेण्यात आले असून, दुपारपासून धरणातून एकूण 11 हजार 930 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

शाहूवाडी तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. 2.05 टी.एम.सी. क्षमतेचे कडवी धरण आज दुपारी 2 वाजता पूर्ण क्षमतेने भरले. धरणातून 220 क्युसेक विसर्ग वीजनिर्मितीसाठी करण्यात येत होता, तो आता वाढला आहे. कासारी धरणही सायंकाळी 90 टक्क्यांपर्यंत भरले. या धरणातही पाणी वाढू लागल्याने त्याचे दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून 2 हजार आणि वीजनिर्मितीसाठी 250 असा 2,250 क्युसेक विसर्ग सुरू आहे. यासह राधानगरी धरणातून वीजनिर्मितीसाठी 1,600 क्युसेक, कुंभी धरणातून 350 क्युसेक, घटप्रभा धरणातून 4 हजार 876, जांबरेतून 1,490, तर कोदे धरणातून 634 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील बहुतांशी प्रमुख 14 धरणांत 75 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. घटप्रभा, जांबरे, कोदेसह कडवी ही चार धरणे पूर्ण भरली आहेत. आज सकाळी आठ वाजेपर्यंत राधानगरी 81 टक्के, तुळशी 77 टक्के, वारणा 83 टक्के, दूधगंगा 76 टक्के भरले आहे. कासारी धरण 86 टक्के, तर कुंभी धरण 76 टक्के भरले आहे. पाटगाव धरणात 75 टक्के, चित्रीत 74 टक्के, जंगमहट्टीत 76 टक्के पाणीसाठा झाला आहे. 

जिल्ह्यातील प्रमुख चौदाही धरणांच्या परिसरात गेल्या 24 तासांत अतिवृष्टी झाली. राधानगरीत 160 मि.मी., तुळशीत 148 मि.मी., वारणा परिसरात 107 मि.मी., दूधगंगेत 120 मि.मी., कासारीत 110 मि.मी., कडवीत 76 मि.मी., कुंभीत 160 मि.मी., पाटगावात 150 मि.मी., चिकोत्रा परिसरात 90 मि.मी., चित्रीत 157 मि.मी., जंगमहट्टीत 195 मि.मी., जांबरेत 105 मि.मी., तर कोदे धरण परिसरात 209 मि.मी. पाऊस झाला आहे.जिल्ह्यातील 89 बंधारे दुपारपर्यंत पाण्याखाली गेले होते. त्यामुळे सुमारे 200 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटलेला आहे. मलकापूर-उदगिरी, चंदगड-हेरे, कागल-इचलकरंजी, रंकाळा-बुरंबाळ, रंकाळा-चौके या मार्गावरील एस.टी. वाहतूक बंद आहे. आसुर्ले-पोर्ले-कोतोली मार्गावर सकाळी झाड पडले. यामुळे काही काळ वाहतूक बंद होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने झाड बाजूला केल्यानंतर दुपारपासून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 33 घरांची पडझड झाली. आजअखेर 219 घरांची पडझड झाली असून, त्यात 54 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

किटवडे येथे अ‍ॅग्रो फार्मचे शेड उध्वस्त : घरांची पडझड

आजरा : प्रतिनिधी

आजरा तालुक्यामध्ये पावसाने थैमान घातले असून जोरदार वार्‍यासह झालेल्या पावसामुळे लाखोंची हानी झाली आहे. किटवडे येथे अ‍ॅग्रो फार्मचे शेड कोसळून सुमारे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी घरांची पडझड होत असल्याने सर्वसामान्य नागरिक पावसामुळे धास्तावले असून पाऊस थांबण्याची प्रतिक्षा करु लागले आहेत.

पावसामुळे पारपोलीपैकी खेडगे येथील जॉर्ज परसू बार्देस्कर, बबन बाबू बार्देस्कर, संतान बाबू बार्देस्कर, बाबू लुईस बार्देस्कर, शाहू धाकू फर्नांडीस, मिलन इन्सू बार्देस्कर, मायकल बार्देस्कर, मोतेन बार्देस्कर, सुळेरान येथील गोविंद बाळू कांबळे, आजरा शहरातील मुल्ला यासह तालुक्यातील पन्नासभर घरांची पडझड झाली आहे. किटवडे येथील सुधाकर प्रभू यांच्या बंधिस्त शेळीपालन फार्मवरील पत्र्याचे शेड वार्‍याबरोबर उडून जावून लाखो रुपयांचे नुकसान झाले. जुन्या मटण मार्केट इमारतीची भिंत अशोक साळुंखे राहत असलेल्या घरावर कोसळल्याने साळुंखे कुटुंबियांना तलाठी भवन येथे हलविण्यात आले आहे. आजरा-चंदगड मार्गावरील का. कांडगाव येथे दरड व झाडे कोसळल्याने काहीकाळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.    पावसाची संततधार कायम असल्याने व प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिल्याने तालुकावासियांमध्ये पावसामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुरगूड - मुदाळतिट्टा मार्ग बंद

ब्रिटिशकालीन निढोरी पुलानजीक पाणी ; निपणीचा तळ कोकणाशी संपर्क तुटला

मुदाळतिट्टा : प्रतिनिधी

सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीला महापुर आला आहे. पूराच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. राधानगरी -निपाणी मार्गावर मुरगूड येथील स्मशानशेड म्हणजेच येथील ब्रिटिशकालीन पुलानजीक रस्त्यावर पूराचे पाणी आले आहे. त्यामुळे येथून होणारी वाहतूक बंद झाली आहे. मुरगूड - मुदाळतिट्टा मार्ग बंद झाला असून निपणीचा तळ कोकणाशी संपर्क तुटला आहे. रस्त्यावर पाणी असताना देखील वाहनधारक या पूराच्या पाण्यातून वाहने चालवित आहेत. रस्त्यावर पाण्याचा वाढता ओघ पाहून विद्यार्थी वर्गाने शाळा सोडून आपल्या घरी जाणे पसंद केले.

कुरणी, सुरूपली, वाघापूर दरम्यान असणार्‍या बंधार्‍यावर गेले दहा दिवस पाणी राहिल्याने येथून होणारी वाहतूक बंद आहे. परिणामी निढोरी -मुरगूड - कागल अशी वाहतूक सूरु होती. सतत होणार्‍या मुसळधार पावसामूळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुरगूड, शिंदेवाडी, यमगे या तीन गावांना पाण्याचा पुरवठा करणार्‍या सरपिराजीराव तलावामध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. एकूण 39 फुट पाणी साठवण क्षमता असणार्‍या या तलावामध्ये आजअखेर 27 फूट पाणीसाठा झाला आहे. गेले आठ दिवस पुराचे पाणी पात्राबाहेर असलेल्याने नदीकाठावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामूळे पिके कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरीबांधव पिकाच्या भांगलणीच्या कामात गुंतला आहे. पुरस्थिती असल्यामुळे शाळा, ज्युनिअर कॉलेज, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होती.

भुदरगड तालुक्यात अतिवृष्टी; पाटगाव धरणात 75 टक्के पाणीसाठा; सात बंधारे पाण्यखाली; दहा घरांची अशंतः पडझड

गारगोटी : प्रतिनिधी

गेले चार दिवस भुदरगड तालुक्यात अतिवृष्टी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे पाटगाव जलाशयात 75 टक्के पाणीसाठा झाला आहे. वेदगंगा नदीवरील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तालुक्यात दहा घरांची अशंतः पडझड झाली आहे. ठिठिकाणी झाडांच्या फांद्या विजेच्या तारेवर पडल्याने काही गावातील विज गायब झाली आहे. भुदरगड तालुक्यात चार दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वहात आहेत. तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वेदगंगा नदीचे पाणी गेल्या चार दिवसापासून पात्राबाहेर असल्यामुळे नदी काठची पिके पाण्याखाली गेली आहेत. या पिकांना धोका निर्माण झाला आहे. वेदगंगा नदीवरील मानी, आनफ, शेळोली, आकुर्डे, म्हसवे, निळपण, वाघापूर हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. म्हसवे बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील मिणचे परिसरात होणारी वहातुक बंद झाली आहे. आकुर्डे बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे विजयमार्गावरील वहातुक बंद झाली आहे. ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या विजेच्या तारेवर पडल्याने काही गावातील विज गायब झाली होती. गारगोटीतील घोटणे पेट्रोल पंपाच्या पाठिमागील विजेच्या  तारा तुटल्यामुळे हा परिसर रात्रभर अंधारात राहिला. 

पाटगाव येथील मौनी सागर जलाशयाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. 623.30 मिटर पाणी पातळी असून 78.70 दलघमी पाणी साठा झाला आहे. पाटगाव धरण 75 टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात तालुक्यात सरासरी 67.40 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. पिंपळगाव परिसरात 71मिमी, कूर 11 मिमी, कडगाव 95 मिमी, करडवाडी 85 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आकुर्डे येथील शशिकांत शंकर सुतार, मारूती नारायण सुतार, मोरेवाडी येथील विजय तात्यासो पाटील, पुष्पनगर येथील शिवाजीराव कालेकर, पाचर्डे येथील आनंदा कांबळे, वासनोली पैकी थड्याचीवाडी येथील धनाजी दत्तू ढेकळे, मठगाव येथील दत्तात्रय सोनवने, मडूर येथील मानसिंग नांदूलकर, मधूकर सुतार, फणसवाडी येथील हिंदुराव साळवी यांच्या घरांच्या भिंती पडून नुकसान झाले आहे. 

राधानगरी संततधार पाऊस

राधानगरी धरण 84 टक्के भरले; काळम्मावाडी 75 टक्के तर तुळशी 79 टक्के भरले

कौलव : प्रतिनिधी

राधानगरी तालुक्याला आजही मुसळधार पावसाने झोडपून काढले असून तालुक्यातील तिन्ही प्रमुख धरणे ओव्हर फ्लो होण्याची शक्यता बळावली आहे. भोगावती नदीवरील कसबा तारळे व शिरगाव बंधार्‍यावर पाणी आल्यामुळे वहातुक विस्कळीत झाली आहे. नगरी तालुक्याला सलग पाच दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आजही दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. तालुक्याच्या  पश्‍चिम  भागात पावसाचा जास्त जोर आहे. आज तिन्ही धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तिन्ही धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत राधानगरी धरणात 7.05 टीएमसी म्हणजेच 84 टक्के पाणीसाठा झाला. या धरणातून प्रतिसेकंद 1600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणात दररोज सरासरी अर्धा टीएमसी पाणी साठत आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास तीन चार दिवसांत धरण पुर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षापेक्षा धरण लवकर भरण्याची शक्यता आहे. 

तुळशी धरण क्षेत्रात आतापर्यंत 1817 मिली मिटरर्स पाऊस झाला असून आतापर्यंत 2.74 टीएमसी म्हणजेच 79 टक्के पाणीसाठा झाला आहे. केळोशी लघु पाटबंधारे प्रकल्पातून या धरणात प्रतिसेकंद 180 क्युसेक्स पाणी येत असल्याने हा प्रखल्पही जलदगतीने भरण्याची शक्यता आहे. काळम्मावाडीच्या पाणलोट क्षेत्रात आजअखेर 19.05 टीएमसी म्हणजे 75 टक्के पाणीसाठा झाला आहे. या धरणात आजअखेर 1942 मिली मिटर्स  पाऊस  झाला असून गतवर्षी याच तारखेपर्यंत 1132 मिली मिटर्स पाऊस झाला होता. 641 मिटर्सची पाणीपातळी झाल्यानंतर या धरणातून नियमित पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. 

तिन्ही धरण क्षेत्रात गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. भोगावती नदीला महापूर आला असून पाणी मोठ्या प्रमाणात नदीपात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे या नदीवरील कसबा तारळे व शिरगाव येथील बंधारे पाण्याखाली केले असून वहातुक विस्कळीत झाली आहे. ही वहातुक राशिवडे, राधानगरी व सडोली खालसा मार्गे चालू आहे. 

जूने विजकेंद्र सुरू करण्याची गरज

राधानगरी धरणाच्या पायथ्याशी असणारे जुने  विजे केंद्र बंदच आहे. त्यामुळे त्याद्वारे नियमितपणे होणारा पाण्याचा विसर्ग व विजनिर्मिती बंदच आहे. या केंद्रातील तीन जनित्रे सुस्थितीत असून त्यातून नियमित 1600 क्युसेक्स प्रतिसेकंद विसर्ग होऊ शकतो. या वर्षी धरण लवकर भरण्याची चिन्हे असूण ढगफुटी सदृश्य पाऊस झाला अथवा पाणीसाठा वाढला तर स्वयंचलीत दरवाजांसह मुख्य दरवाजातून पाणी सोडण्याची वेळ येणार आहे. राधानगरी धरण यापुर्वी दि. 23 जुलै 2013, 1 ऑगष्ट 2014, 24 ऑगष्ट 2015, 3 ऑगष्ट 2016, 26 ऑगष्ट 2017 रोजी पूर्ण  क्षमतेने भरले होते. 

तुळशी धरण 77 टक्के भरले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

धामोड : वार्ताहर 

चालूवर्षी तुळशी धरण क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पाऊस झाला असुन तुळशी धरण 77 टक्के भरले आहे. केळोशी बुद्रुक येथील लघू पाटबंधारे प्रकल्पातून येणारे पाणी व मुसळधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असुन पाटबंधारे विभागाने तुळशी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी मध्यम पाटबंधारे प्रकल्प 77  टक्के भरला आहे. तुळशी धरण क्षेत्रात गतवर्षी 16 जुलै 2017 अखेर 948 मी. मी. इतका पाऊस झाला होता. तर चालुवर्षी 16 जुलै 2018 अखेर 1775 मी. मी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात 148 मी. मी. पावसाची नोंद झाली असुन केळोशी बुद्रूक येथील लोंढा नाला प्रकल्पातून येणारे सुमारे दोनशे क्युसेक्स पाणी व या परिसरात सुरु असलेला मुसळधार पाऊस यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाचा जोर असाच राहीला तर येत्या चार दिवसात प्रकल्प पुर्ण भरणार असल्याचा अंदाज शाखा अभियंता एस. ए. कळके यांनी व्यक्त केला आहे. तुळशी नदीकाठच्या राधानगरी व करवीर तालुक्यातील वीस गावांना पाटबंधारे विभागाकडुन सतर्कतेचा इशारा देण्यात आला असुन नदीपात्रा शेजारील विद्युत पंप, जनावरांचे गोठे अन्यत्र हलवुन नुकसान टाळावे व वास्तव्यास असलेल्या शेतकर्‍यांनाही सतर्क रहाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पन्हाळा (प्रतिनिधी) पन्हाळा तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने पन्हाळा पश्चिम भागात जन जीवन विस्कळित झाले असुन रस्त्यावर पाणी आल्याने  अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, तालुक्यात गेल्या चोविस तासात 248 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. पन्हाळा येथे 20 मि. मी. वाडी रत्नागिरी येथे 35 मी मि. कोडोली येथे 10 मि मि. कळे 37 मि मि. पडळ41 मिमि. बाजार भोगाव 85 मिमि. कोतोली 37 मिमि.  तालुक्यात आज एकुण 37.86 मिमि सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आज अखेर एकुण 3492 मि मि पाऊस पडला आहे. मुसळधार पावसाने मौजे सातवे येथे घराची पडझड होऊन पन्नास हजाराचे नुकसान झाले, 

कासारी  नदि ने पाणी पातळीत वाढ होत असुन नदी काढ धोक्याच्या पातळीकडे जात आहे,  यवलूज-पोर्ले,माजगाव-पोर्ले दरम्यान असणार्‍या पुलावर पुराचे पाणी आल्याने  वाहतूक बंद आहे, पाटपन्हाळा ता पन्हाळा  येथील पुलावर  पुराचे पाणी आले आहे,  पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे . त्यामुळे पाटपन्हाळा, मुगडेवाडी, पिसात्री, वाशी या गावाचा संपर्क गेल्या चार दिवसांपासून  बाजारभोगाव पासून तुटलेला आहे, बाजारभोगाव ही मुख्य बाजारपेठ असल्याने  संपर्क  तुटलेल्या गावातील ग्रामस्थानी जीवनावश्यक वस्तुचा साठा केला आहे  असे समझते.  पुनाळ -तिरपण रस्त्यावर पूलाच्या दोन्ही बाजूस आलेल्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून कळे -कोतोली वहातूक पूर्णपणे बंद आहे.वाघवे पैकी उदाळवाडीत पावसाने विहीर कोसळली,आहे , कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर लोंघे-किरवे दरम्यान पुराचे पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे, रत्नागिरी कोल्हापुर महामार्गावर केर्ली व आंबेवाडी येथील रस्त्यावर नदिचे पाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, हा रस्ता बंद झाल्यास पन्हाळा व कोतोली, तसेच कोकण मार्गावरील जनजीवन विस्कळीत होण्या