Tue, Jun 02, 2020 22:52होमपेज › Kolhapur › शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज

Published On: May 30 2018 2:18AM | Last Updated: May 30 2018 12:34AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

रायगड किल्ल्यावर 6 जूनला होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. गडावर अन्नछत्र, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा अशा बाबींची पूर्तता अंतिम टप्प्यात आहे. यंदाच्या वर्षी देशभरातून 3 लाख शिवभक्त गडावर येण्याचा अंदाज असून शाहिरी, मर्दानी कलेची प्रात्यक्षिके, पालखी सोहळा असा रंगारंग कार्यक्रम होणार असल्याची माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

छत्रपती युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे रायगडावर आयोजन केले जाते. 5 व 6 जूनला रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन असल्याने यादिवशी सकाळी 7 ते 12 या वेळेत रायगड स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. दुपारी 12 नंतर अन्नछत्र सुरू होणार असून दोन दिवस अखंडितपणे ते चालणार आहे. दुपारी 4 वाजता युवराज संभाजीराजे व यौवराज कुमार शहाजीराजे छत्रपती गडपायथ्यापासून चालत गडावर येतील. साडेचारच्या सुमारास आसपासच्या 21 गावांतील सरपंच व पंचक्रोशीतील ग्रामकन्यांच्या उपस्थितीत गडपूजन होणार आहे. तर 6 वाजता गडावर उत्खननात मिळालेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यानतंर मर्दानी कलेची प्रात्यक्षिके होतील.

 शिवभक्तांशी थेट संवाद 
5 जूनला रात्री 8 ते 9 या वेळेत युवराज संभाजीराजे छत्रपती शिवभक्तांशी संवाद साधणार आहेत. किल्ले संवर्धनाबाबत शिवभक्त यावेळी आपले विचार व्यक्त करू शकतील. यानंतर रात्री 9 वाजता गडदेवता शिरकाईदेवीचा गोंधळ व जागर होईल. 

 शिवराज्याभिषेक सोहळा
6 जूनला सकाळी सहा वाजता ध्वजपूजन, शाहिरी कार्यक्रम होईल. शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन होईल. यानंतर युवराज संभाजीराजे व यौवराज कुमार शहाजीराजे यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात येईल. यावेळी उपस्थित शिवभक्तांना युवराज संभाजीराजे छत्रपती मार्गदर्शन करतील. 

 प्लास्टिकमुक्तीचे आवाहन
गडावर येणार्‍या शिवभक्तांनी प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स सोबत आणू नये. याऐवजी पाणी पिण्यासाठी स्टीलची बॉटल, भोजनासाठी ताट, वाटी स्वत:सोबत आणावी. तसेच गडावर कोठेही प्लास्टिकचा कचरा दिसल्यास तो उचलून गडाखाली न्यावा असे आवाहन केले आहे. 

 पाच शाहिरांचा सहभाग
राजसदरेवर 5 जूनला रात्री शाहिरीचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये शाहीर आझाद नायकवडी, सुरेश जाधव, आलम बागणीकर, रंगराव पाटील, राजेंद्र कांबळे सहभाग घेतील.

 महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणार्‍या महिलांसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी स्वच्छतागृहेही उभारण्यात आली आहेत. यावेळी कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, अमर पाटील, उदय घोरपडे, आझाद नायकवडी, मकरंद ऐतवडे, विनायक फाळके, गणी आजरेकर, विनायक पोवार आदी उपस्थित होते.