Tue, Aug 20, 2019 04:28होमपेज › Kolhapur › रायगड संवर्धन काम १५ दिवसांत सुरू : संभाजीराजे

रायगड संवर्धन काम १५ दिवसांत सुरू : संभाजीराजे

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 09 2018 12:53AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या संवर्धन आणि मजबुतीकरणासाठी स्थापन झालेल्या रायगड प्राधिकरणामार्फत या किल्ल्याचे विकासाचे काम 15 दिवसांत सुरू केले जाईल, अशी माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्राधिकरणाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच खा. संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

खा. संभाजीराजे म्हणाले, रायगड संवर्धनासाठी राज्य सरकारने रायगड प्राधिकरण स्थापन करून 606 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापैकी 80 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. 112 कोटी रुपये प्रत्यक्ष किल्ल्यावर खर्च केले जाणार असून उर्वरित निधीतून परिसरातील 21 गावांत मूलभूत सुविधांसह गावांचा विकास करण्यात येणार आहे. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित राखून मजबुती केली जाईल. पारंपरिक लूक कायम ठेवून किल्ल्यावर विकास कामे केली जाणार आहेत.

किल्ल्याच्या पायथ्याशी 80 एकर जमीन संपादित केली जाणार असून तेथे शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे. उत्खननाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शिवकालीन वस्तू, दस्तऐवजांचे संग्रहालय उभारण्यात येणार असून  त्यासाठी तज्ज्ञांसह आर्किटेक्ट्सची मदत घेणार आहे. खा. संभाजीराजे पुढे म्हणाले, सा. बां., केंद्र व राज्य पुरातत्त्व विभाग, वनविभाग, पर्यटन विभागाच्या अधिकार्‍यांसह अशासकीय सदस्याची प्राधिकरणावर नियुक्ती केली आहे. यामध्ये भगवान चिले, राम यादव, डॉ. जयसिंगराव पवार, सुधीर थोरात रघुजी आंग्रे यांचा समावेश आहे. या कामासाठी लागणार्‍या बहुतांश परवानग्या मिळाल्या असून पंधरा दिवसांत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.    

शुभारंभ समारंभाचे नियोजन सुरू आहे. पुरातत्त्व खात्यामार्फत डेक्कन कॉलेजतर्फे उत्खनन करण्यात येणार आहे. काम मोठे असल्याने काम पूर्ण होण्यास किमान दहा वर्षे अवधी लागेल. या कामात शिवभक्तांनी सूचना कराव्यात, सहभागी व्हावे, सर्वच किल्ल्यांचा विकास करणे अशक्य असल्याने महाराष्ट्रातील उद्योगपती, कॉर्पोरेट कंपन्यांनी या कामात सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन खा. संभाजीराजे यांनी केले. सर्वच ठिकाणी सरकारकडून पैसा मिळणे अशक्य आहे. त्यामुळे  शिवरायांच्या महाराष्ट्रात त्यांचे गडसंवर्धन करण्याची जबाबदारी उद्योगपतींसह कॉर्पोरेट कंपन्यांचीही आहे, असे ते म्हणाले.

रायगड किल्ला हा विश्‍ववंदनीय किल्ला होईल, अशा पद्धतीने रायगड संवर्धनाचे काम करण्याचा चंग बांधला आहे. रायगडावर होणार्‍या नियोजित असणार्‍या 32 मण सुवर्णसिंहासनाबाबत विचारले असता खा. संभाजीराजे यांनी तेथील पालकमंत्री असो अथवा जिल्हाधिकारी कोणालाही रायगडावर प्राधिकरणाशिवाय विकास काम करता येणार नाही, असे स्पष्ट केले. या कामात प्राधिकरणाकडे अद्याप कोणीही विचारणा केली नाही. विचारणा केल्यास पुरातत्त्व कायद्याच्या चाकोरीत आणि गडाचे ऐतिहासिक महत्त्व पारंपरिक लूक यांचा विचार करूनच त्याबाबत निर्णय होईल. रायगड प्राधिकरणात सिंधुदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे.

रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा आणि खानदेश-मराठावाडा येथील प्रत्येकी एक असे सहा आदर्श किल्ले बनविण्यात येतील. त्यानंतर इतर किल्ल्यांच्या संवर्धनाचा विचार केला जाईल, असेही खा. संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेस भगवान चिले, राम यादव आदी उपस्थित होते.