होमपेज › Kolhapur › राहीच्या कुटुंबीयांचा ‘पुढारी’तर्फे गौरव

राहीच्या कुटुंबीयांचा ‘पुढारी’तर्फे गौरव

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 1:27AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 
आशियाई नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदकाचा वेध घेणार्‍या राहीला प्रोत्साहन व पाठबळ देणार्‍या सरनोबत कुटुंबीयांचा गौरव दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक व उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी केला. 6 सप्टेंबर रोजी कोरियाला होणार्‍या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेेसाठीही शुभेच्छा दिल्या. 
 बुधवारी त्यांनी राहीच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना पुष्पगुच्छ देऊन पेढे भरवत त्यांचे अभिनंदन केले. स्वत: नेमबाज असणार्‍या डॉ. योगेश जाधव यांनी राहीची वाटचाल आणि खेळाचे बदलते स्वरूप या विषयावर सविस्तर चर्चाही केली. क्रीडानगरी कोल्हापूरकरांसाठी बुधवारचा दिवस अविस्मरणीय ठरला. आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राहीने देशासाठी सुवर्णपदक खेचून आणले. या तिच्या यशाचे कौतुक  दै.  ‘पुढारी’ परिवारातर्फे डॉ. योगेश जाधव यांनी केले. यावेळी राहीचे वडील जीवन सरनोबत, काका राजेंद्र सरनोबत, भाऊ आदित्य सरनोबत व अजिंक्य सरनोबत आणि पाहुणे शशिकांत सावंत आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. जाधव यांनी 28 वर्षांपूर्वीच्या आपल्या नेमबाजी खेळातील  इतिहासाला उजाळा दिला. या खेळातील आमूलाग्र बदलांबाबत चर्चा केली. खेळाडूंना मिळणार्‍या विविध प्रकारच्या सोयी-सुविधांबद्दल माहिती घेतली. राहीच्या यशस्वी वाटचालीबाबतही सविस्तर माहिती घेतली.