Sun, Jul 21, 2019 10:26होमपेज › Kolhapur › कोल्हापूरकरांचा पदकावर अचूक ‘निशाणा’

कोल्हापूरकरांचा पदकावर अचूक ‘निशाणा’

Published On: Aug 25 2018 1:15AM | Last Updated: Aug 24 2018 11:05PMकोल्हापूर : सागर यादव 

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाचा वेध घेऊन राही सरनोबत हिने क्रीडानगरी कोल्हापूरचा रांगडा बाज पुन्हा एकदा संपूर्ण जगाला दाखवून दिला. देशाच्या खात्यात सुवर्णपदकाची भर घालून तिरंगा अभिमानाने फडकविला. या तिच्या यशामुळे कोल्हापूरच्या नेमबाजी (शूटिंग) परंपरेबद्दल क्रीडाप्रेमींत पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे. 
राजाश्रय आणि लोकाश्रयाच्या पाठबळामुळे कोल्हापूरच्या खेळ क्षेत्राला शतकोत्तर परंपरा लाभली आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी रचलेल्या भक्कम पायावर छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शहाजी महाराज यांनी ‘केएसए’ च्या माध्यमातून विविध खेळांना प्रोत्साहन आणि पाठबळ दिले. याचबरोबर क्रीडाप्रेमी नागरिकांच्या प्रोत्साहनामुळे विविध खेळ विकसित झाले. क्रीडानगरीतील कोल्हापूरकर प्रत्येक खेळप्रकारात आघाडीवर आहेत. पारंपरिक कुस्तीपासून ते अत्याधुनिक अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस्मध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. नेमबाजी (शूटिंग) खेळात तर तीन पिढ्यांनी आपली घोडदौड राखली आहे.

तीन पिढ्यांचा इतिहास... 

जयसिंग कुसाळे यांनी कोल्हापुरात या खेळाचा पाया घातला. पुढे ही परंपरा मुलगा  रमेश कुसाळे, सून कल्पना कुसाळे, नातू तेजस कुसाळे व नात स्नेहा कुसाळे यांनी अखंड राखली आहे.   महानगरपालिकेने 1965 ला दुधाळी येथे छत्रपती संभाजी महाराज नेमबाजी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या रेंजवर अनेक नामवंत खेळाडू घडले. आज विभागीय क्रीडा संकुल, जे. बी. कुसाळे अ‍ॅकॅडमी, वेध अ‍ॅकॅडमी, तेज अ‍ॅकॅडमी, ऑलिम्पिक अ‍ॅकॅडमी यांसह ग्रामीण भागातील कुडित्रे येथील नरके अ‍ॅकॅडमीत अनेक खेळाडू घडत आहेत. 

नावलौकीक प्राप्त करणारे खेळाडू...

क्रीडनगरी कोल्हापुरातून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू नावारूपाला आले. यात दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, दीपक पाटील-सडोलीकर, रवी पाटील, संजय पाटील, अभिजित कोंडुसकर, अजित खराडे या वरिष्ठांपाठोपाठ मधल्या काळात तेजस्विनी सावंत, संदीप तरटे, नवनाथ फरताडे, फुलचंद बांगर, राधिका बराले, गिरिजा देसाई, कन्हैया बाबर, विनय पाटील, जितेंद्र विभुते, युवराज चौगले, श्रुती पाटील, ऋचिता लावंड अशी परंपरा सुरू राहिली. सध्या अनुष्का पाटील, अभिज्ञा पाटील, जानकी पाटील आणि शाहू माने हे खेळाडू हा वारसा जपत आहेत.