होमपेज › Kolhapur › काळम्मावाडी ५७, तुळशी ६५, राधानगरी ६५ टक्के

काळम्मावाडी ५७, तुळशी ६५, राधानगरी ६५ टक्के

Published On: Jul 13 2018 1:23AM | Last Updated: Jul 13 2018 1:00AMतुरंबे : वार्ताहर

राधानगरी तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी, काळम्मावाडी आणि तुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणार्‍या पावसामुळे दूधगंगा आणि भोगावती नद्यांचे पाणी वाढले आहे. गुरुवारी संपलेल्या 24 तासांत तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात एकूण 282 मि.मी. पाऊस झाला आहे. राधानगरी धरण 65 टक्के भरले असून धरणात 5.40 टी. एम. सी. पाणीसाठा झाला आहे. तर काळम्मावाडी धरण 57 टक्के भरले असून तुळशी धरण 65 टक्के भरले आहे. आज धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस झाला.

गुरुवारी राधानगरी धरण परिसरात सकाळी 8 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत 125 मि.मी. पाऊस झाला असून आजअखेर 1829 मि.मी. पाऊस झाला आहे. धरणाची पाणी पातळी 329.70 फूट, तर पाणीसाठा 5404.70 दशलक्ष घनफूट झाला आहे. 1600 क्युसेकने खासगी पॉवर हाऊसमधून पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपत्रात सुरू आहे. यामुळे भोगावती नदीवरील बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

तुळशी धरण परिसरात आज 73 मि.मी. पाऊस झाला आहे. तर आजअखेर 1307 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात 2.24 टीएमसी पाणी असून धरण 65 टक्के भरले आहे. मागील वर्षी याच दिवसांत 1.99 टीएमसी पाणी धरणात होते.

पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच वीज निर्मितीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला असल्याचे स्थापत्य अभियंता विजय सुतार यांनी सांगितले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीकाठावरील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा तहसीलदार शिल्पा ओसवाल यांनी दिला आहे.