Tue, Apr 23, 2019 13:35होमपेज › Kolhapur › जागतिक वारसा नामशेष होण्याचा धोका

जागतिक वारसा नामशेष होण्याचा धोका

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 1:03AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : सुनील कदम

राधानगरी हे ‘युनेस्को’ने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेले संपूर्ण देशातील अत्यंत महत्त्वाचे आणि जागतिक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एक अतिशय संवेदनशील असे अभयारण्य आहे. मात्र, या ठिकाणी हिंडाल्को कंपनीच्या वतीने सुरू असलेली प्रचंड प्रमाणातील बॉक्साईट खोदाई विचारात घेता नजीकच्या काही काळातच हे जागतिक वारसास्थळ नामशेष होण्याचा धोका स्पष्टपणे दिसू लागलेला आहे.

राधानगरी हे 1958 साली घोषित केलेले देशातील पहिले अभयारण्य आहे. जवळपास 351 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या या अभयारण्याइतकी जैवविविधता देशातील अन्य कोणत्याही अभयारण्यामध्ये आढळून येत नाही. प्रामुख्याने हे अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध असले, तरी येथे वाघ, बिबटे, हरीण, गेळा, सांबर, भेकर, रानडुक्कर, रानकुत्रा, अस्वल, शेकरू, रानमांजर, उदमांजर, ससा, लंगूर यासह जवळपास 35 प्रकारचे प्राणी आढळून येतात. याशिवाय गरुड, गिधाड, घार, मोर, पोपट, कबुतर, बदक, पाणकोंबडा, माळढोक, धनेश, रानकोंबडा यासह जवळपास 235 प्रकारचे पक्षी आणि फुलपाखरांच्या कित्येक प्रजाती आढळून येतात. अभयारण्यात 1,800 प्रकारच्या वनस्पती प्रजाती आढळून येतात आणि जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही न आढळून येणार्‍या 300 प्रकारच्या औषधी वनस्पती केवळ याच अभयारण्यामध्ये आढळून येतात. त्यामुळेच सह्याद्री पर्वतरांगा आणि जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीने या अभयारण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे तर ‘युनेस्को’ने या अभयारण्याचा जागतिक वारसास्थळामध्ये समावेश केला आहे.

असे असताना शासनाने या अभयारण्याच्या परिसरातील दुर्गमानवाड भागात हिंडाल्को कंपनीला बॉक्साईट खोदाईचा परवाना दिलेला आहे. कंपनीकडून या भागातून दररोज दीड ते दोन हजार टन बॉक्साईटची वाहतूक सुरू आहे. या बॉक्साईटच्या उत्खननासाठी कंपनी अजस्र यंत्रांच्या सहाय्याने या भागातील डोंगरच्या डोंगर भुईसपाट करताना दिसत आहे. बॉक्साईट खोदाईमुळे झालेला ‘वनसंहार’ भयंकर स्वरूपाचा आहे. 

कंपनीला देण्यात आलेली परवानगी आणखी दोन वर्षासाठी म्हणजे 2020 सालापर्यंतची असली, तरी परवान्याची ही मुदत आणखी काही वर्षे वाढवून मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येते. कंपनीला आणखी काही काळ बॉक्साईट खोदाईची परवानगी दिली, तर अभयारण्याच्या परिसरात काय हाहाकार माजेल, त्याचा अंदाज येण्यास मुळीच हरकत नाही. त्यामुळे हिंडाल्को कंपनीचा येथील बॉक्साईट खोदाईचा परवाना तातडीने रद्द करण्याची गरज 
आहे.

अभयारण्यातील जैवविविधता संकटात!
हिंडाल्को कंपनीच्या बॉक्साईट खोदाईमुळे अभयारण्यातील विविध प्रकारची वृक्षसंपदा नष्ट होऊ लागली आहे. यंत्रांच्या आवाजामुळे अभयारण्यातील प्राणी-पक्षी परागंदा होऊ लागले आहेत. जैवविविधता धोक्यात येऊ लागली आहे. मुळात राधानगरी अभयारण्य हे जागतिक जैवविविधतेसाठी जागतिक पातळीवर नावाजलेले ठिकाण आहे. ही जैवविविधताच नामशेष करून साधला जाणारा कोणत्याही प्रकारचा विकास हा कदाचित भविष्यातील विध्वंसाची नांदी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.