Fri, Jul 19, 2019 18:26होमपेज › Kolhapur › राधानगरी 84; काळम्मावाडी 75, तुळशी 79 टक्के

राधानगरी 84; काळम्मावाडी 75, तुळशी 79 टक्के

Published On: Jul 17 2018 1:34AM | Last Updated: Jul 16 2018 10:47PMकौलव/राधानगरी : प्रतिनिधी

राधानगरी तालुक्याला आजही मुसळधार पावसाने झोडपून काढले असून तालुक्यातील तिन्ही प्रमुख धरणे ओव्हर फ्लो होण्याची शक्यता बळावली आहे. भोगावती नदीवरील कसबा तारळे व शिरगाव बंधार्‍यावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

राधानगरी तालुक्याला सलग पाच दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आजही दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. तालुक्याच्या  पश्‍चिम  भागात पावसाचा जास्त जोर आहे. आज तिन्ही धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तिन्ही धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत राधानगरी धरणात 7.05 टीएमसी म्हणजेच 84 टक्के पाणीसाठा झाला. या धरणातून प्रतिसेकंद 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणात दररोज सरासरी अर्धा टीएमसी पाणी साठत आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास तीन-चार दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपेक्षा धरण लवकर भरण्याची शक्यता आहे.

तुळशी धरण क्षेत्रात आतापर्यंत 1817 मिलीमीटर्स पाऊस झाला असून, आतापर्यंत 2.74 टीएमसी म्हणजेच 79 टक्के पाणीसाठा झाला आहे. केळोशी लघू पाटबंधारे प्रकल्पातून या धरणात प्रतिसेकंद 180 क्युसेक पाणी येत असल्याने हा प्रखल्पही जलदगतीने भरण्याची शक्यता आहे. काळम्मावाडीच्या पाणलोट क्षेत्रात आजअखेर 19.05 टीएमसी म्हणजे 75 टक्के पाणीसाठा झाला आहे. या धरणात आजअखेर 1942 मिलीमीटर्स  पाऊस  झाला असून गतवर्षी याच तारखेपर्यंत 1132 मिली मीटर्स पाऊस झाला होता. 641 मीटर्सची पाणीपातळी झाल्यानंतर या धरणातून नियमित पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. 
तिन्ही धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. भोगावती नदीला महापूर आला असून, पाणी मोठ्या प्रमाणात नदीपात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे या नदीवरील कसबा तारळे व शिरगाव येथील बंधारे पाण्याखाली केले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही वाहतूक राशिवडे, राधानगरी व सडोली खालसामार्गे चालू आहे. 

जुने वीज केंद्र सुरू करण्याची गरज

राधानगरी धरणाच्या पायथ्याशी असणारे जुने  विज केंद्र बंदच आहे. त्यामुळे त्याद्वारे नियमितपणे होणारा पाण्याचा विसर्ग व वीजनिर्मिती बंदच आहे. या केंद्रातील तीन जनित्रे सुस्थितीत असून त्यातून नियमित 1600 क्युसेक प्रतिसेकंद विसर्ग होऊ शकतो. यावर्षी धरण लवकर भरण्याची चिन्हे असूण ढगफुटीसद‍ृश पाऊस झाला अथवा पाणीसाठा वाढला तर स्वयंचलित दरवाजांसह मुख्य दरवाजातून पाणी सोडण्याची वेळ येणार आहे. राधानगरी धरण यापूर्वी दि. 23 जुलै 2013, 1 ऑगस्ट 2014, 24 ऑगस्ट 2015, 3 ऑगस्ट 2016, 26 ऑगस्ट 2017 रोजी पूर्ण  क्षमतेने भरले होते. 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धामोड : वार्ताहर

चालूवर्षी तुळशी धरण क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पाऊस झाला असून तुळशी धरण 77 टक्के भरले आहे. केळोशी बुद्रुक येथील लघू पाटबंधारे प्रकल्पातून येणारे पाणी व मुसळधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून पाटबंधारे विभागाने तुळशी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी मध्यम पाटबंधारे प्रकल्प 77  टक्के भरला आहे. तुळशी धरण क्षेत्रात गतवर्षी 16 जुलै 2017 अखेर 948 मि. मी. इतका पाऊस झाला होता. तर चालुवर्षी 16 जुलै 2018 अखेर 1775 मी. मी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या चोवीस तासांत 148 मि. मी. पावसाची नोंद झाली असून केळोशी बुद्रुक येथील लोंढा नाला प्रकल्पातून येणारे सुमारे दोनशे क्युसेक पाणी व या परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

पावसाचा जोर असाच राहीला तर येत्या चार दिवसांत प्रकल्प पूर्ण भरणार असल्याचा अंदाज शाखा अभियंता एस. ए. कळके यांनी व्यक्‍त केला आहे.तुळशी नदीकाठच्या राधानगरी व करवीर तालुक्यातील वीस गावांना पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीपात्राशेजारील विद्युत पंप, जनावरांचे गोठे अन्यत्र हलवून नुकसान टाळावे व वास्तव्यास असलेल्या शेतकर्‍यांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.