Mon, Jan 21, 2019 09:24होमपेज › Kolhapur › ‘बाबाला दक्षचे शेवटचे हट्टही पुरविता आले नाहीत’

‘बाबाला दक्षचे शेवटचे हट्टही पुरविता आले नाहीत’

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 11 2018 1:07AM

बुकमार्क करा
राशिवडे : प्रतिनिधी  

कोल्ह्याच्या चाव्यामुळे रेबीज झालेल्या येथील कु. दक्ष संग्राम पाटील (वय 10) या चौथीत शिकणार्‍या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला. एकुलता असलेल्या दक्षचा असा हकनाक मृत्यू झाल्याने सारा गाव हळहळला. कु. दक्ष हा राशिवडे येथील परशुराम विद्यालयामध्ये चौथीत शिक्षण घेत होता.

वडील संग्राम माजी ग्रा.पं. सदस्य व ‘भोगावती’मध्ये नोकरीला. त्यांचा दक्ष हा एकुलता मुलगा. चार महिन्यांपूर्वी दक्षचा श्‍वानाने चावा घेतला, त्यावेळी रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आले होते. त्यानंतर परसातच त्याच्या टाचेचा कोल्ह्याने चावा घेतला होता. ही बाब त्याने घरी न सांगता टाचेला काच लागल्याचे सांगितले. त्याप्रमाणे औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर दक्षचे शाळेत जाणे, खेळणे, बागडणे सुरू होते. अंग दुखतंय, असे सांगून मित्रांना आलोच म्हणून शाळेतून बाहेर पडलेला दक्ष अखेर रेबीजचा बळी ठरला.

अचानकच मंगळवारी दक्ष उजेडाला भिऊ लागला, एकटाच बसू लागला, हात-पाय दुखताहेत म्हणून सांगू लागला. त्याला तत्काळ राशिवडेतील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु, रेबीजची लक्षणे असल्याने त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. तत्काळ त्याला दाखलही केले; पण वेळ निघून गेली होती. दक्षवर रेबीजने आक्रमणच केले होते. त्याला अंधार खोलीत ठेवण्यात आले. जेवण, पाणी वगैरे देण्यास निर्बंध घालण्यात आले होते. अखेर काही तासांतच दक्षने बाबांसमोरच जगाचा निरोप घेतला.

चार महिन्यांपूर्वी श्‍वानाने दंश केलेल्या दक्षचा हट्ट पुरविलेल्या बाबाला मात्र अखेरच्या क्षणाचे हट्ट मात्र पुरविता आले नाहीत, हे दुर्दैव ठरले. डॉक्टरांनीच तसे लेखी घेतल्याने चिमुकल्या दक्षचे बाबा हतबल होते.