Thu, Mar 21, 2019 15:28होमपेज › Kolhapur › ससा झाला बेघर!

ससा झाला बेघर!

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 03 2018 1:21AMकोल्हापूर : विजय पाटील 

रानटी ससा हा गोंडस दिसणारा इवलासा जीव. वाहनाच्या प्रकाशात रस्ता ओलांडताना राखट-पांढर्‍या रंगाचा हा ससा सर्रकन आपल्या समोरुन जातो. लुसलुशीत असा हा ससा काही दिवसांपासून बेघर झाला आहे. त्याच्या जमिनीखाली असणार्‍या बिळात (सशाचे घर) संततधार पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे सशांसारखे जमिनीखाली राहणारे प्राणी बेघर झाले असल्याचे निरीक्षण पर्यावरणतज्ज्ञांनी नोंदवले. यामध्ये साप, उंदीर आदींचाही समावेश आहे. 

मागील सत्तर दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. कोल्हापुरात गेल्या 37 वर्षांत असा सलग पाऊस पडल्याची पहिल्यांदाच नोंद पर्यावरण अभ्यासकांकडे आहे. दररोज पाऊस पडल्याने अपवाद वगळता सूर्याचे दर्शनही झालेले नाही. अशा या पावसाळी वातावरणाचा फटका सशासारख्या जमिनीखाली राहणार्‍या प्राण्याला बसला आहे. कारण ससे सैरभैर झाले असल्याने रानावनानजीक असणार्‍या घरांमध्ये आसरा घेत आहेत तर बहुतांश ससे गवतांच्या चिखलयुक्‍त दलदलीत आश्रयाला असल्याचे पर्यावरण अभ्यासकांना दिसून आले. ससा हा अत्यंत भित्रा प्राणी असल्याने तो निर्जन  ठिकाणी लपून राहण्याचा प्रयत्न करतो. एकूणच पावसाने सशांना बेघर केले आहे. दुसर्‍या बाजूला सरपटणारे सापासारखे प्राणी, उंदरांचाही नेहमीचा अधिवास पावसामुळे नष्ट झाला आहे. परंतु, या प्राण्यांनी झाडांची ढोली किंवा इतर ठिकाणी आसरा शोधला आहे. 

डोंगरपठारावरील ससे सुरक्षित

यंदा पावसाने पर्यावरणातील जैवविविधतेत खूपच बदल केला आहे. कारण पशू-पक्ष्यांसाठी ऊन-पाऊस अशा आपल्याकडे असणार्‍या समिकरणानुसार अधिवास तयार झाले आहेत. यंदा पाऊस सलग आणि दीर्घकाळ पडल्याने जमिनीखाली राहणार्‍या प्राण्यांची पंचाईत झाली आहे हे नक्‍की. परंतु, डोंगरपठारावर राहणार्‍या सशांना याचा फटका बसलेला नाही. -फारुक म्हेत्तर (पर्यावरण अभ्यासक)

सशांसारख्या प्राण्यांवर पावसाचा परिणाम

ससा हा बिळात घर करून राहणारा वन्यजीव आहे. सलग पावसाने जमिनीत पाणी साचून राहिल्याने एकूणच अशा प्राण्यांची जैवशृंखला पुढे-मागे होईल असे दिसते. पण याचा अभ्यास करण्याची गरज आहे. सशांसारख्या प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी पावले उचलली जातील. - एम. जी. धुमाळ (उपवनसंरक्षक)