होमपेज › Kolhapur › आरटीओ पासिंग वाहनांची रस्त्यावरच दुरुस्ती

आरटीओ पासिंग वाहनांची रस्त्यावरच दुरुस्ती

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 23 2017 11:30PM

बुकमार्क करा

कंदलगाव : वार्ताहर

आरटीओ पासिंगसाठी येणारी वाहने भारती विद्यापीठ मुख्य रस्त्यावर पार्किंग करून वाहनांची किरकोळ कामे करीत असल्याने प्रवाशी वर्गातून संतप्‍त प्रतिक्रिया उमटत आहेत.

भारती विद्यापीठ शेजारी नव्यानेच सुरू केलेल्या आरटीओ पासिंग सर्कलमध्ये येणारी वाहने प्रशासकीय नियमानुसार सक्षम असणे गरजेचे आहे. पासिंग सुरू असताना यापैकी अनेक वाहनांना हेड लाईट नसणे, साईड इंडिकेटर सुरू नसणे, मोठ्या वाहनांना रिफ्लेक्टर नसणे, सूचना फलक, हॉर्न अशा त्रुटी राहिल्याने ही वाहने पासिंग होत नाहीत. अशा वेळी ज्या वाहनांमध्ये या त्रुटी आहेत ती वाहने कंदलगाव मुख्य रस्त्यावरच पार्किंग करून उर्वरित कामे सुरू असतात. अशा वेळी परिसरात असणारी शाळा, कॉलेज व प्रवाशांची गर्दी होऊन अनेकदा वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत.  

आरटीओ पासिंगसाठी प्रस्तापित केलेली जागा मोठ्या प्रमाणावर असूनही या ठिकाणी येणारी वाहनेही मोठ्या संख्येने येत असल्याने प्रस्तावित जागा ही कमी पडत आहे. त्यामुळे पासिंगसाठी येणार्‍या वाहनांचे पार्किंग मुख्य रस्त्यावर होत असल्याने प्रवाशांची कसरत होत आहे. रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीमुळे महिला प्रवाशांत भीतीचे वातावरण असून संबंधित आरटीओ प्रशासनाने आपल्याकडे पासिंगसाठी येणारी वाहने आपल्या जागेतच पार्किंग करावीत, अशी मागणी होत आहे.