Wed, Apr 24, 2019 16:37होमपेज › Kolhapur › कोट्यवधी रुपये अडकले

‘आरटीई’ प्रवेश शैक्षणिक शुल्काचे कोट्यवधी रुपये अडकले

Published On: Apr 07 2018 2:00AM | Last Updated: Apr 07 2018 12:53AM
कोल्हापूर : प्रवीण मस्के

गाजावाजा करीत शासनाने सुरू केलेल्या वंचित व आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांच्या 25 टक्के प्रवेश शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीचे मागील काही वर्षांचे जिल्ह्यातील 371 शाळांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत.

बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार (आरटीई) अल्पसंख्याक शाळा वगळता सर्व शाळांमध्ये 2012-13 पासून प्राथमिक शाळांमध्ये पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थीसंख्येपैकी 25 टक्के जागा वंचित गट व दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. या बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत शिक्षण विभाग शंभर टक्के प्रवेशाचे टार्गेट पूर्ण करू शकला नाही. 

जिल्ह्यातील ज्या शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रवेश शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती अद्याप झालेली नाही. 2012-13 वर्षात 398 शाळा पात्र ठरल्या. यातील केवळ 74 शाळांना शैक्षणिक प्रतिपूर्ती शुल्क देण्यात आले. 2014-15 मध्ये पात्र 209 शाळांपैकी 82 शाळांना प्रतिपूर्तीची काही रक्कम मिळाली. 2015-16 मध्ये 252 शाळा पात्र ठरल्या आहेत. मागील चार वर्षांतील उर्वरित 371 शाळांचे सुमारे नऊ कोटींहून अधिक रुपये अद्याप शाळांना मिळालेले नाहीत. वारंवार शाळांकडून प्रस्ताव पाठविले जातात. परंतु, शिक्षण विभागाकडून अनुदान आले नसल्याचे कारण पुढे केले जाते. यामुळे शाळा प्रशासन व पालकांसमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत.
 

Tags : RTE admission, educational fees