Fri, Apr 19, 2019 08:10होमपेज › Kolhapur › रंकाळ्यावरही आता ‘क्‍विन्स नेकलेस’

रंकाळ्यावरही आता ‘क्‍विन्स नेकलेस’

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 12:33AMकोल्हापूर : सतीश सरीकर 

कोल्हापूर शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या जागेत ‘सनसेट पॉईंट’ (सूर्यास्त) साकारण्यात येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि रंकाळ्याच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी संध्यामठजवळील जागेत हा पॉईंट केला जाणार आहे. त्याबरोबरच मुंबईतील मरिन ड्राईव्हच्या धर्तीवर एलईडीच्या माध्यमातून रंकाळा तलावाला ‘नेकलेस ऑफ क्‍विन’चा लूक देण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने त्यासाठी तब्बल पावणेसात कोटींचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाला नुकताच सादर करण्यात आला. 

रंकाळा तलाव म्हणजे नैसर्गिक खण असून भूकंपानंतर तेथे नैसर्गिक झरे पाझरून तलावाची निर्मिती झाली. सातव्या शतकामध्ये तेथे समाधी व मंदिरे बांधण्यात आली होती. 1883 ला बंधारा बांधण्यात आला. त्यानंतर काळानुसार चौपाटी, शालिनी पॅलेस, रंकाळा टॉवर, संध्यामठ, नंदी देवालय, धुण्याची चावी अशा ऐतिहासिक व पुरातन वास्तू बांधण्यात आल्या. परंतु, गेल्या काही वर्षांपासून रंकाळा तलाव मरणासन्‍न अवस्थेतून मार्गक्रमण करत होता. रंकाळा संवर्धन योजनेतून सुमारे साडेआठ कोटींची विकासकामे झाल्यानंतर आता पुन्हा रंकाळ्याला गतवैभव प्राप्त होऊ लागले आहे. 

कोल्हापुरात अनेक ऐतिहासिक व धार्मिक स्थळे आहेत. मात्र, सनसेट पॉईंटसारखे स्थळ नाही. त्यामुळे आता रंकाळा तलावातील संध्यामठजवळ असलेल्या खडकाळ जागेत सनसेट पॉईंट तयार करण्यात येणार आहे. एकूणच रंकाळा तलावाचे संवर्धन करण्यासाठी 4 कोटी 80 लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात रंकाळा तलावाच्या दगडी तटबंदीला कोपिंग करण्याबरोबरच इतर कामासाठी 3 कोटी 10 लाख, टॉवरसाठी 1 कोटी व संध्यामठ व धुण्याची चावीच्या विकासासाठी 70 लाखांचा  समावेश आहे. रंकाळा परिसरातील विद्युतीकरणासाठी 2 कोटींचा आराखडा तयार केला आहे. यात वेगवेगळ्या आकाराच्या एलईडी लाईटस् , फ्लड लाईटस् , स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून सुशोभिकरण केले जाणार आहे.