Thu, May 23, 2019 21:24
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › संविधान बदल हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला

संविधान बदल हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 26 2018 1:27AMकोल्हापूर : प्रतिनिधी

संविधानात दुरुस्ती होऊ शकते; पण त्यात बदल होऊ शकत नाही. काही शक्ती हे संविधान बदलण्याचा प्रयत्न करत असून, यामुळे देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येणार आहे. त्यामुळे संविधानातील बदलाकडे बारकाईने पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले. शाहू सांस्कृतिक भवन मार्केट यार्ड येथे आयोजित ‘बामसेफ’च्या 31 व्या राज्य अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष डी.आर.आर्या होते.

भारताची एकसंघ राष्ट्र म्हणून जगभरात ओळख असल्याचे सांगून आ.ह.साळुंखे म्हणाले, भारतीय समाज व्यवस्था संमिश्र आहे. तरीही काही मूल्ये ही मूल्यांवर आधारलेली आहे. हे एकसंघ राष्ट्र तोडण्यासाठी वेगवेगळे डावपेच आखले जात आहेत. लोकतंत्रावर होणारे हल्ल्यांचेे डावपेच लोकतंत्राचा वापर करून विचारांनी मोडून काढण्याची गरज आहे. ज्यांना संविधान मान्य नाही, असे लोक धर्मग्रंथातील विचार नव्या पिढीवर लादण्याचा प्रयत्न करत असून, ही बाब लोकशाही कार्यप्रणाली असणार्‍या आपल्या देशाला धोकादायक आहे. त्यामुळे लोकशाहीवर विश्‍वास असणार्‍यांनी अहिंसक पद्धतीने संविधानाचे संरक्षण करण्याची गरज आहे. 

 ज्येष्ठ साहित्यिका नजुबाई गावित यांनी देश पुन्हा भांडवलशाही मूल्यांकडे झुकत आहे. याला आताच विरोध करण्याची गरज आहे. प्रसंगी धोका पत्करून संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे सांगितले. निवृत्त पोलिस अधीक्षक डॉ. संजय अपरांती यांनी संविधानाच्या सुरक्षेेततेसाठी आतापासूनच सर्वांनी योग्य भूमिका घेण्याची गरज आहे, कालांतराने उशीर झाला, असे म्हणण्याची वेळ येऊ नये, यासाठी विरोधकांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे सांगितले. स्वागत बाबासाहेब कांबळे यांनी केले. प्रास्ताविक रवी मोरे यांनी केले. अरुण गोडघाटे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. दुपारच्या सत्रात लोकतंत्राची हत्या करणार्‍यांना लोकतंत्राच्या हत्याराने नेस्तनाबूत करण्याची योग्य संधी या विषयावर कॉ. धनाजी गुरव, जावेद कुरेशी, मनीषा तोकले यांनी  विचार मांडले. आजच्या दुसर्‍या दिवशी सकाळी 9 ते 1 या वेळेत समूह चर्चा होणार असून, सायंकाळी  हिंसक ब्राम्हणवाद्यांच्या सर्वनाशाचे एकच पर्याय फुले, शाहू, आंबेडकरवाद या विषयावर प्राचार्य राजेंद्र कुंभार आपले विचार मांडणार आहेत.