Wed, Jun 26, 2019 11:27होमपेज › Kolhapur › राजर्षी शाहूंची मूल्यदृष्टी हेच अघोषित आणीबाणीला उत्तर : प्रा. पुष्‍पा भावे

राजर्षी शाहूंची मूल्यदृष्टी हेच अघोषित आणीबाणीला उत्तर : प्रा. पुष्‍पा भावे

Published On: Jun 26 2018 6:53PM | Last Updated: Jun 27 2018 2:32AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आजच्या अघोषित आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करायचा असेल तर, शाहू महाराजांची मूल्यदृष्टीच उपयोगी पडेल, असे मत ज्येष्ठ साहित्यिका प्रा.पुष्पा भावे यांनी व्यक्त केले. आपल्याला जे करायचे ते मूल्यदृष्टीने केले तर त्याची तड लागणार आहे, हे बळ आपल्याला शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आगरकर यांच्याकडूनच घेता येईल. पण, या लोकांना आपण पचवूनच टाकले. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा विचार जागता ठेवला नाही म्हणून ही परिस्थिती आल्याची खंतही प्रा. भावे यांनी व्यक्त केली. 

येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने शाहू जयंती निमित्त देण्यात येणारा प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार प्रा. भावे यांना प्रदान करण्यात आला. शाहू स्मारक भवनमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रा. भावे बोलत होत्या.  
शाहूंच्या विचाराचे काम प्रत्येकाला थोडे थोडे करता आले तर ते देशातील राजकारण्यांना दृष्टी देईल. सामान्यांचे हे काम राजकारण्यांना नव्याने विचार करायला लावेल. काही तरी प्रत्यक्ष घडतेय असे दाखवावे वाटेल, त्याचवेळी आपण शाहू महाराजांच्या नावाला, त्यांच्या मूल्यदृष्टीला न्याय दिला असे म्हणता येईल, असे प्रा. भावे म्हणाल्या. 

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, शाहू महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी जी काळजी वाहिली, त्यातून शंभर वर्षांपूर्वी त्यांनी जे कार्य केले ते आजही आचंबित करणारे आहे. शाहूंच्या नावे प्रा. भावे यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांनाही त्यांच्या कार्यात उत्तेजन मिळेल.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भावे यांना देण्यात आलेेल्या सन्मानपत्राचे वाचन जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी केले. प्रा. भावे यांचा परिचय डॉ. अशोक चौसाळकर यांनी करून दिला. सौ. रोहिनी सुभेदार यांच्या हस्ते प्रा. भावे यांचा साडी-चोळी देऊन गौरव करण्यात आला. व्यासपीठावर ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आझाद नायकवडी कलामंचने सादर केलेल्य शाहू गौरवगीताने झाली.  ताज मुल्लाणी यांनी सूत्रसंचालन केले. 

गायत्री शिंदे हिचा गौरव 

या कार्यक्रमात शाहू महाराजांवर ‘माझा राजा, शाहू राजा’ हे पुस्तक लिहणार्‍या राधानगरी तालुक्यातील 13 वर्षांच्या गायत्री शिंदे हिचा सत्कार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. शिंदेही पुस्तक लिहू शकतात, हे गायत्रीने लिहिलेल्या पुस्तकामुळे कळाले. तिच्याकडून प्रेरणा घेऊ, अशा शब्दांत कुलगुरू देवानंद शिंदे यांनी तिचे कौतुक केले. 

कोल्‍हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्‍टच्या वतीने देण्यात येणारा २०१८ सालचा राजर्षी शाहू पुरस्‍कार प्रा. पुष्‍पा भावे प्रदान करण्यात आला. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कोल्‍हापुरातील शाहू स्‍मारक भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याहस्‍ते भावे यांना पुरस्‍कार देण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्‍हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे उपस्‍थित होत. 

सामाजिक क्षेत्रात केलेली उल्‍लेखनीय कामगिरी आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतीशील वारसा चालविल्याबद्दल प्रा. भावे यांची पुरस्‍कारासाठी निवड करण्यात आली. राजर्षी शाहू पुरस्‍काराचे १ लाख रुपये, स्‍मृती चिन्‍ह आणि मानपत्र असे देऊन भावे यांना समारंभपूर्वक गौरविण्यात आले. 

दरम्यान, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्‍ट, कोल्‍हापूरच्या वतीने १९८४ पासून दरवर्षी राजर्षी शाहू पुरस्‍कार प्रदान करण्यात येतो. राजर्षी शाहू जयंतीनिमित्त समाज कार्य, समाज प्रबोधन, साहित्य, कला, संस्‍कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा आदी क्षेत्रात दीर्घ काळ उल्‍लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्‍ती अथवा संस्‍थेस हा पुरस्‍कार दिला जातो. 

कोण आहेत प्रा. पुष्‍पा भावे

पुष्‍पा भावे यांचा जन्‍म मध्यमवर्गीय पुरोगामी विचाराच्या घरामध्ये झाला. समताधिष्‍ठीत विचारांचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. मराठी साहित्य, सौंदर्यशास्‍त्र, नाट्यशास्‍त्र या क्षेत्रांत सांकल्‍पनिक पातळीवर स्‍पष्‍टता व नेमकेपणा असणार्‍या आणि उत्‍कट संवेदनशील प्रभावी अध्यापक म्‍हणून त्यांची ख्याती आहे. 

प्रा. भावे यांनी नाट्यशास्‍त्राची सैद्धांतीक मांडणी करणारे कसदार लेखन केले असून समीक्षक म्‍हणूनही त्यांना मराठी साहित्य विश्वात आदराचे स्‍थान आहे. तसेच संयुक्‍त महाराष्‍ट्राच्या लढ्यापासून सार्वजनिक जीवनास भावे यांनी प्रारंभ केला. त्यानंतर शाहीर अमर शेख यांच्या सानिध्यात लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणार्‍या डाव्या विचाराच्या कार्यकर्त्या म्‍हणून त्यांची ओळख आहे. भावे या गोवा मुक्‍ती आंदोलनातही सक्रीय होत्या. 

संयुक्‍त महाराष्‍ट्र चळवळ, गोवा मुक्‍ती आंदोलन, दलित पॅन्‍थर चळवळ, आणीबाणीविरोधातील लढा, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, डॉ. बाबा आढाव यांची एक गाव एक पाणवठा, हमाल पंचायत, देवदासी मुक्‍ती चळवळ या चळवळी, आंदोलनातही प्रा. पुष्‍पा भावे अग्रभागी होत्या. तसेच त्यांनी असंघटित महिला कामगारांसाठीही लढे दिले. 

महाराष्‍ट्रातील समतेच्या आंदोलनांना, शोषिताच्या लढ्यांना त्या आजही विचार आणि कृतीने मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या या विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्याबद्दल त्यांना यंदाच्या राजर्षी शाहू पुरस्‍काराने सन्‍मानित करण्यात आले आहे.