होमपेज › Kolhapur › कामाचे नेटके नियोजन; काटेकोर अंमलबजावणी करा

कामाचे नेटके नियोजन; काटेकोर अंमलबजावणी करा

Published On: May 10 2018 1:35AM | Last Updated: May 10 2018 12:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी

नागरिकांना गतिमान प्रशासन देण्यासाठी कामांचे नेटके नियोजन करा व त्याची काटेकोर अंमलबजावणी करा, अशा सूचना विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी अधिकार्‍यांना दिल्या. संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी असणारा सातबारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. जिल्ह्यातही हा उपक्रम प्राधान्याने पूर्ण करावा, त्यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे आदेशही त्यांनी दिले.

पुणे विभागीय आयुक्‍त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. म्हैसेकर यांनी कोल्हापूर भेट देत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. हा जिल्हा आपल्याला चांगलाच परिचित असल्याचे सांगून येथे चांगल्या कामांची मोठी परंपरा आहे. त्यामुळे कामांची डेडलाईन ठरवून नियोजन करा व त्याप्रमाणे अंमलबजावणी करा. डिजिटल स्वाक्षरीसह सातबारा हा उपक्रम प्राधान्यक्रमाचा आहे. यात कोल्हापूर जिल्हा व पुणे विभाग यांची कामगिरी वेळेत पूर्ण व्हावी यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हैसेकर म्हणाले, खरीप पिक कर्ज आराखडा यशस्वीपणे राबवा. आराखड्यानुसार कर्जवाटप होईल यासाठी दक्ष रहा. बी-बियाणांची शेतकर्‍यांना अडचण येणार नाही असे नियोजन करा. पीक कर्जमाफीबाबत उद्दिष्ट व साध्य याचा सातत्याने आढावा घ्या. आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करा. यंत्रणा कुशल मनुष्यबळ सज्ज ठेवून उपलब्ध यंत्रसामग्रीची चाचणी घ्या. पीक आणेवारीबाबत डाटाबेस तयार करा, अशा सूचना दिल्या. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत आदी सर्व निवडणुकांमध्ये निवडणूक खर्चाची कागदपत्रे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विहित मुदतीत, विहित कागदपत्रांसह व विशिष्ट नमुन्यातच स्वीकारा. निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करा, असेही त्यांनी  सांगितले.  

यावेळी उपायुक्‍त प्रताप जाधव यांनी महसूलविषयक विविध विषयांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी कोल्हापूर जिल्ह्याने महसुली उद्दिष्ट 121 टक्क्यांनी पूर्ण केल्याचे सांगून मे अखेरपर्यंत ऑनलाईन सातबाराचे काम पूर्ण होईल असे सांगितले. अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या पुनर्वसनाची सद्यस्थिती सांगितली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, भूसंपादन अधिकारी अविनाश हादगल, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.