होमपेज › Kolhapur › अंबाबाई मंदिरावरील शिल्पांना संरक्षण कधी?

अंबाबाई मंदिरावरील शिल्पांना संरक्षण कधी?

Published On: Aug 01 2018 1:24AM | Last Updated: Aug 01 2018 1:07AMकोल्हापूर : प्रिया सरीकर

शिल्प सौंदर्यांनी नटलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे मंदिर 64 योगीनींनी परिवेष्टित आहे. अत्यंत देखण्या अशा या शिल्प सौंदर्याची अवस्था आता बिकट बनली आहे. मंदिर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्याचे सांगून देवस्थान समिती आजवर वेळ काढत आली होती. गेल्या काही वर्षांत मंदिराच्या बाह्य भागावरील ही शिल्प जीर्ण झाल्याचे निदर्शनास आले आहे. तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात मंदिराच्या बाह्य भागाची पडझडही झाली. शिवाय, अनेक वर्षांपासून भग्नावस्थेत असलेल्या शिल्पांवर जाळी धरू लागली आहे.  तीर्थक्षेत्र आराखड्याचा निधी नाही. पुरातत्त्व विभागाकडून देखभाल-दुरुस्ती नाही. त्यामुळे मंदिरावरील शिल्प सौंदर्याला संरक्षण मिळणार की नाही, असा सवाल आता भक्तांना सतावू लागला आहे. 

भारतीय संस्कृतीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. यापैकी एक म्हणजे मंदिर स्थापत्य. भारतातील मंदिर स्थापत्याचा अतिप्राचिन नमुना म्हणून कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची ख्याती सर्वदूर आहे. आजवर अभिजात शिल्पकलेचा नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जात होते. तारकाकृती मंदिराच्या मंडोवरावर वसलेल्या स्त्री शिल्पामुळे सुरसुंदरींनी नटलेले मंदिर असेही संबोधले जाते. वास्तवात मात्र मंदिराच्या मंडोवरावरील या सुंदरी म्हणजे 64 योगीनी आहेत. अंबाबाई मंदिरावरील योगीनींचीही पुराणकथा आहे. आजच्या घडीला मात्र या सर्व शिल्पांची अवस्था बिकट होत चालली आहेत. मंदिर सौंदर्यात भर घालणार्‍या सुरसुंदरींची शिल्प अनेक वर्षांपासून भग्न आहेत. 1960 च्या दशकात मंदिरात चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. यावेळी चित्रीकरणासाठी शिल्पांना प्लास्टर ऑफ पॅरिस लावून जोडण्यात आले होते. पण, आता प्लास्टर ऑफ पॅरिसने सुस्थितीत आणलेल्या मूर्तीवरील प्लास्टर गळून गेले आहे. शिवाय, भग्न मूर्तींना जाळी धरू लागली आहे. अनेक मूर्तींचे अवशेष मोडकळीस आले आहेत. अनेकांचे अवशेष गायब झाले आहेत. तीन वर्षांपूर्वी अंबाबाई मूर्तीचे रासायनिक संवर्धन करण्यात आले. त्यावेळी मंदिराच्या बाह्य शिल्पांच्या सौंदर्याचाही विचार व्हायला हवा होता. पण, मंदिर संवर्धनाचा हा विषय देवस्थान, तीर्थक्षेत्र आराखडा, पुरातत्त्व विभाग असा फिरत असून अनेक वर्षे अडकून पडला आहे. 

देवस्थान लक्ष देणार का? 
तीर्थक्षेत्र आराखड्यात मंदिराच्या संवर्धनाची जबाबदारी देवस्थान समितीने घेतली आहे. त्यासाठी लागणारा निधी देवस्थान समिती उपलब्ध करणार आहे. असे असतानाही मंदिराचे संवर्धन आजवर प्रलंबित का? यापूर्वी देवस्थान समितीला अध्यक्ष नसल्याने मंदिर संवर्धन दुर्लक्षित झाले होते. पण, वर्षभरापूर्वी देवस्थान समितीला अध्यक्ष मिळाले आहेत. नूतन अध्यक्षांनी मंदिराशी निगडीत अनेक गोष्टींवर उपाय योजना केल्या. मात्र मंदिर संवर्धनाबाबत काहीच ठोस विचार झालेला नाही.  मूर्ती संवर्धनापूर्वी पुरातत्त्वच्या उपायुक्त डॉ. माया पाटील यांनी मंदिराला भेट देवून मंदिराची पाहणी करून मंदिराच्या बाह्य भिंतीवरील शिल्पांना इपॉक्सी लेप देऊन किंवा रासायनिक संवर्धनाने सुरक्षित करता येते. यासाठी देवस्थान समितीने पुरातत्त्व विभागाकडे पत्र व्यवहार केल्यास निधीही मिळू शकेल, असे सांगितले होते. 

शिलाहाराच्या राजवटीत अंबाबाई मंदिर 64 योगीनींनी परिवेष्टीत केल्याचे सांगीतले जाते. शिरूर तहसील बागलकोट जिल्हा विजापूर येथील शिलालेख इ.स..971 मधील आहे. तर दुसरा शिलालेख 985 मधील आहे. दोन्ही शिलालेख कानडी व संस्कृत भाषेत असून शिरूरच्या सिद्धेश्‍वर मंदिरातील दक्षिण भिंतीवर कोरण्यात आले आहेत. शिलालेखातून अंबाबाई मंदिर हे 64 योगिनींनी परिवेष्टीत असे देवीचे स्थान असल्याचा उल्लेख आहे.