Thu, Jun 20, 2019 02:14होमपेज › Kolhapur › असहाय युवतींच्या देहाचा भरतोय बाजार !

असहाय युवतींच्या देहाचा भरतोय बाजार !

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 16 2018 12:26AMकोल्हापूर : दिलीप भिसे

युवतींच्या असहायतेचा गैरफायदा उठवीत हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा फंडा जिल्ह्यात वाढू लागला आहे.‘चोरी चोरी छुपके छुपके’ चालणार्‍या वेश्या अड्ड्याचे लोण शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही फोफावू लागले आहे.  अनैतिक मानवी व्यापार्‍यात आंतरराज्य टोळ्यांचे वाढते कारनामे सामाजिकदृष्ट्या चिंतेचाच विषय बनू लागला आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवसांत आंबा येथील एका रिसॉर्टसह कोतोली फाटा, जयसिंगपूर  (ता. शिरोळ) येथील एका आलिशान हॉटेलसह चिपरी फाट्याजवळील खोलीवर छापा टाकून वेश्या अड्ड्याचा पर्दाफाश केला. पथकाने पीडित युवतींची सुटका करून हॉटेल व्यवस्थापकासह एजंटाचा बुरखा फाडला.

  गेल्या वर्षभरासह जानेवारी 14 ते फेब्रुवारी 18 कालावधीत पथकाने शहर, उपनगरांसह ग्रामीण भागातील 17 अड्ड्यांवर छापे टाकून 35 पेक्षा अधिक पीडित युवतींची तस्करांच्या विळख्यातून सुटका केली आहे. तस्करी टोळीशी संबंधित पन्नासांवर कारवाई करण्यात आली.

आर्थिकदृष्ट्या कमजोर, असहाय युवतींचा गैरफायदा घेऊन त्यांना वाममार्गाला लावणार्‍या काही सराईत टोळ्या जिल्ह्यात सक्रिय झाल्या आहेत. हप्तेगिरीला सोकावलेल्या स्थानिक सराईत टोळ्यांवर ‘चिरीमिरी’ची बरसात करून एव्हाना प्रशासनांतर्गत झारीतील काही शुक्राचार्यांना हाताशी धरून ग्रामीण भागात त्याची पाळेमुळे रुजविण्याचा तस्करी टोळ्यांचा डाव वेळीच हाणून पाडणे गरजेचे आहे.  
कोल्हापूर, सांगलीसह बेळगाव जिल्ह्यांत छुप्या कुंटणखान्यांचे वाढते प्रमाण धक्कादायक आहे. मुंबईसह पश्‍चिम बंगाल व आसाममधील अनेक बड्या तस्करांचे लागेबांधे येथे निर्माण झाले आहेत. कोल्हापूर पोलिस पथकाने 2018 मध्ये केलेल्या कारवाईत पश्‍चिम बंगाली 8 व आसामधील 3 पीडित युवती हाताला लागल्या आहेत. दीड वर्षापूर्वी शिवाजी पुलाजवळील निर्जन ठिकाणी एका बांगलादेशी तरुणीचा खून झाला. स्थानिक मारेकरी जेरबंद झाला; पण तस्कराचा अजूनही सुगावा लागलेला नाही. 

7-10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद!
अल्पवयीन अथवा असहायतेचा गैरफायदा घेऊन युवती, महिलांना शरीरविक्रयासाठी भाग पाडणार्‍या तस्कराविरुद्ध सुधारित कायद्यामध्ये कठोर कारावासासह जबर दंडाची तरतूद आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 अन्वये मुली, युवतींना वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणार्‍यांना दहा वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात 10 घरमालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात शहर, उपनगरांतील मालमत्ताधारकांचा समावेश आहे.

अनैतिक मानवी वाहतुकीची साखळी उद्ध्वस्त करून रॅकेटमध्ये प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष गुंतलेल्या तस्कराविरुद्ध प्रसंगी मोका, झोपडपट्टीदादाविरोधी कायद्यासह तडीपारीचा बडगा उगारण्यात येत आहे. साखळीविरुद्ध कठोर पावले उचलण्यासाठी नागरिकांनीही निर्भयपणाने पुढे यावे.
- संजय मोहिते, पोलिस अधीक्षक, कोल्हापूर