Tue, Jul 23, 2019 10:32होमपेज › Kolhapur › लॉजिंगच्या आडून राजरोस वेश्या व्यवसाय

लॉजिंगच्या आडून राजरोस वेश्या व्यवसाय

Published On: May 09 2018 2:04AM | Last Updated: May 08 2018 11:49PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पेठवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर वेश्या व्यवसायाने लॉजिंग-बोर्डिंगना कुंटणखान्याचे स्वरूप आले आहे. परप्रांतीय ते स्थानिक महिला, गरजू युवतींना वाममार्गाला लावून या रॅकेटमध्ये ओढले जात असल्याचे भीषण चित्र या परिसरात पाहावयास मिळत आहे. या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असून, हे अर्थचक्र चालक, मालक व त्यांना वरदहस्त देणार्‍या अधिकार्‍यांना सुखावणारे असले, तरी यातून अनेकांच्या आयुष्याची राखरांगोळी होत असून लॉजिंग-बोर्डिंगच्या नावाखाली चाललेल्या वेश्या व्यवसायाला पायबंद कोण घालणार, असा संतप्त सवाल करण्यात येत आहे.

हातकणंगले तालुका सधन म्हणून ओळखला जातो. तालुक्याच्या पश्‍चिम विभागात पेठवडगाव पोलिस ठाण्याची हद्द आहे. या हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग जात आहे. मुंबई ते गोवा आणि रत्नागिरी ते विजापूर या मार्गावरील वाहतुकीचे वाठार हे मुख्य स्थानक बनले आहे. त्यामुळे वाठार परिसर अवैध धंद्यांचे आगर बनला आहे. सर्व सोयींनीयुक्त असलेल्या या भागात वाहनचालक व इतर प्रवाशांसाठी बहुतांश लॉजिंग-बोर्डिंग सज्ज झाली आहेत. कालांतराने या मुख्य उद्देशाला तिलांजली देऊन कुंटणखाना चालवण्याकडेच अनेक लॉजिंग-बोर्डिंगनी मोर्चा वळवला आहे. या व्यवसायातून अफाट पैसा मिळत असल्याने अनेकांनी मोठी आर्थिक गुंतवणूक करून आलिशान लॉजिंग-बोर्डिंग उभारले आहेत. 

या लॉजिंग-बोर्डिंगच्या बाहेरून आत नेमके कोणते उद्योग चालत आहेत, याची पुसटशीही कल्पना येत नाही; परंतु आंबटशौकिनांना या उद्योगाची पुरेपूर माहिती असल्याने त्यांच्यासाठी खास सोय रॅकेटच्या माध्यमातून करण्यात येत आहे. बाहेरून कॉलगर्ल मागवून त्यांना प्रवासी म्हणून दाखवणे आणि या व्यवसायातून उखळ पांढरे करून घेणे, असाच उद्योग काही हॉटेल व्यावसायिकांनी चालवला आहे. 

अशा लॉजेसवर ‘पाखरू’ पाठवण्यासाठी कोल्हापूर शहरातील ‘सलीम’ आपल्या सँट्रोतून सज्ज असतो. तो गिर्‍हाईकांची खात्री पटल्यानंतर मोबाईलवरच युवतींचे दिमाखदार फोटो पाठवून निवड करण्याची सूचना करतो. त्यानुसार गिर्‍हाईकाने निवड केल्यानंतर संबंधित युवतीला संबंधित लॉजवर पाठवण्यात येते. या कामगिरीने ‘सलीम’ भैया म्हणजे अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा बनला आहे, तर पेठवडगाव परिसरातील काही हॉटेलवर एक ‘रिक्षावाला’ कॉलगर्ल पुरवण्याचे काम इनामे इतबारे करीत आहे. हायप्रोफाइल ते घरगुती महिला मिळवून देणारा ‘माणूस’ म्हणून त्याची आसपासच्या परिसरात चांगलीच ओळख आहे. त्यामुळे त्याच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली भागातून आंबटशौकिनांची मोठी गर्दी असते. त्याचा हा धंदा बिनधोक चालला आहे, यासाठी तो अधिकार्‍यांना दरमहा घसघशीत दाम देत असल्याची उघड चर्चा पोलिस वर्तुळातच आहे. नेहमी साध्या वेशात वावरणार्‍या पोलिसाची त्याच्याशी चांगलीच घसट आहे. त्यामुळे कमाई वरपर्यंत पोहोचवणे अगदी सोपे झाले आहे. यापूर्वी विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केल्याचा इतिहास आहे; परंतु या कारवाईला न जुमानता पुन्हा व्यवसाय जोरात सुरू आहे.

ब्लॅकमेलिंग करणार्‍या टोळ्यांचा वावर 
लॉजिंग व बोर्डिंग चालवण्यासाठी कायद्याने कडक नियम घालून दिले आहेत. लॉजचा वापर करणार्‍या प्रवाशाकडून ओळखपत्र घेणे सक्तीचे केले आहे. तसेच लॉजचा वापर कोणत्या कारणासाठी होणार आहे, याचाही उल्लेख करणे रजिस्टरमध्ये आवश्यक असते; परंतु असे कोणतेही नियम या परिसरातील लॉजेस व बोर्डिंगकडून पाळले जात नाहीत. त्यामुळे या परिसरातील लॉजेस व बोर्डिंगवर बलात्कार झाल्याची तक्रार यापूर्वी अनेक वेळा झाली आहे; परंतु त्यापासून कोणताही बोध घेतला जात नसल्याने अशा लॉजेसचा वापर करून प्रतिष्ठितांना ब्लॅकमेल करण्याचा उद्योगही काही टोळ्यांनी चालवला आहे. त्यामुळे अशा टोळ्यांनाही भरभक्कम कमाईचा मार्ग या काळ्या धंद्याने मिळाला आहे. 
 

Tags : kolhapur city, Prostitute business