Fri, Jul 19, 2019 19:49होमपेज › Kolhapur › धावपट्टीसाठी अतिरिक्‍त नऊ एकर जमिनीचा प्रस्ताव

धावपट्टीसाठी अतिरिक्‍त नऊ एकर जमिनीचा प्रस्ताव

Published On: Jun 01 2018 2:04AM | Last Updated: Jun 01 2018 1:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टीसाठी अतिरिक्‍त नऊ एकर जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य विमानतळ प्राधिकरणाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी बैठक झाली.कोल्हापूर विमानतळाचा विकास गतीने सुरू आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विस्तारीकरणाचा 274 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. धावपट्टीसाठी 82 कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदा दोन दिवसांत उघडण्यात येणार असून, सप्टेंबरपासून धावपट्टी विस्तारीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही विमानतळ विकास कामासाठी पाठपुरावा सुरू आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी बैठक झाली.

कोल्हापूर विमानतळाची सध्या 1370 मीटर लांबीची धावपट्टी आहे. ही धावपट्टी आता 2300 मीटर केली जाणार आहे. धावपट्टीच्या विस्तारीकरणामुळे एअरबस 320 क्षमतेची मोठी विमानेही कोल्हापूर विमानतळावर उतरू शकतात. यामुळे धावपट्टी अधिक मजबूत व्हावी, याकरिता नऊ एकर अतिरिक्‍त जागा देण्यात येणार आहे. त्याच्या संपादनाचा प्रस्ताव तातडीने पाठवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. प्राधिकरणाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रसंगी खासगी वाटाघाटीद्वारे जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

वन विभागाची जमीन विमानतळ विस्तारीकरणासाठी घेण्यात आली आहे. या जमिनीच्या मोबदल्यात वन विभागाला देण्यात येणार्‍या 1 कोटी 82 लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव वित्त मंत्रालयात आहे, त्याचा पाठपुरावा करून हा निधी वन विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. विस्तारीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेवरील सातपैकी सहा अतिक्रमणे काढून टाकण्यात आली आहेत. उर्वरित एक अतिक्रमण लोकप्रतिनिधींच्या मदतीने काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. विस्तारीकरणात उजळाईवाडी-तामगाव रस्ता बंद होणार आहे. त्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.