Sun, Jul 21, 2019 07:50होमपेज › Kolhapur › शहरातील प्रॉपर्टी कार्ड होणार ऑनलाईन

शहरातील प्रॉपर्टी कार्ड होणार ऑनलाईन

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 07 2018 1:53AMकोल्हापूर : अनिल देशमुख

शहरातील प्रॉपर्टी कार्डही ऑनलाईन होणार आहेत. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे शहरातील मिळकतधारकांना कोठेही प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार आहे.

शहरातील मिळकतधारकांना त्यांची प्रॉपर्टी कार्ड सहजपणे उपलब्ध व्हावीत, याकरिता ती ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात सुमारे 43 हजार प्रॉपर्टी कार्ड आहेत, त्यावर सुमारे 5 लाख नोंदी आहेत. प्रॉपर्टी कार्डवरील सर्व नोंदींचे विश्‍लेषणही करण्यात येणार आहे. यामुळे मिळकतधारकाला प्रॉपर्टी कार्डवरील सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. नगरभूमापन अधिकारी किरण माने यांनी याकरिता पुढाकार घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात प्रॉपर्टी कार्डांचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. याकरिता कार्यालयास आवश्यक साधनसामग्री उपलब्ध झाली असून, त्याचे काम येत्या काही दिवसांत सुरू केले जाणार आहे. यानंतर प्रॉपर्टी कार्डच्या प्रत्यक्ष ऑनलाईन प्रक्रियेचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे येत्या काही महिन्यांत कोल्हापुरातील मिळकतधारकांना त्यांचे प्रॉपर्टी कार्ड कोठेही सहजपणे उपलब्ध होणार आहे.

शहरातील सात-बारांचेही प्रॉपर्टी कार्ड होणार

शहरात मोठ्या प्रमाणात अजूनही मिळकतींचे सात-बारा उतारे आहेत. त्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड व्हावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्याद‍ृष्टीनेही प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शहरातील सात-बारा असणार्‍या मिळकतींपैकी पहिल्या टप्प्यात नगरभूमापन अधिकारी स्तरावर निर्णय घेता येतील अशा मिकळतींचे सात-बारा उतारे बंद करून प्रॉपर्टी कार्ड तयार केले जाणार आहे.

पहिला टप्पा डिसेंबरअखेर पूर्ण होईल

प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन झाले, तर नागरिकांचा त्रास कमी होणार आहे. प्रॉपर्टी कार्डसाठी त्यांना कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. तसेच त्यांना केव्हाही, कोणतेही प्रॉपर्टी कार्ड पाहता येणार आहे. या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे ऑनलाईन प्रॉपर्टी कार्डचा पहिला टप्पा डिसेंबरअखेर पूर्ण होईल, असा विश्‍वास नगरभूमापन अधिकारी किरण माने यांनी व्यक्‍त केला.