Sat, Nov 17, 2018 00:36होमपेज › Kolhapur › पर्यायी पुलाचे काम लांबणीवर

पर्यायी पुलाचे काम लांबणीवर

Published On: Jul 13 2018 1:23AM | Last Updated: Jul 13 2018 12:55AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगेवरील पर्यायी पुलाचे काम आता काही दिवस लांबणार आहे. पुलाच्या अबडमेंटसाठी आवश्यक पाया म्हणून स्लॅब टाकण्यात येणार आहे, त्या जागेवर पंचगंगेचे पाणी शिरले आहे. यामुळे पर्यायी पुलाचे काम आता आणखी काही दिवस बंद राहणार आहे.

पुलासाठी कोल्हापूरच्या दिशेने अबडमेंटचे काम सुरू आहे. त्यासाठी आवश्यक पाया लागला नसल्याने त्या ठिकाणी स्लॅब टाकून त्यावर अबडमेंटचे काम करण्यात येणार आहे. मात्र, या स्लॅबसाठी अद्याप राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून अंतिम डिझाईन (संकल्पचित्र) आलेले नाही. यामुळे गेल्या काही दिवसांपासून काम बंदच आहे.

दरम्यान, पंचगंगेच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. त्यातच जोरदार पाऊस असल्याने स्लॅब टाकण्यात येणार्‍या जागी पाणी साचू लागले आहे. दिवसभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यातच सायंकाळनंतर नदीचेही पाणी या परिसरात शिरण्यास सुरुवात झाली. यामुळे या ठिकाणी काम करणे अशक्यच बनले आहे. त्यातच जोरदार पावसाने स्लॅबच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी भराव तयार करून केलेला तात्पुरत्या स्वरूपाचा मार्गही धोकादायक झाला आहे. त्याचा काही भाग पाऊस आणि पाण्यामुळे ढासळू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर पर्यायी पुलाचे काम काही दिवस बंदच राहणार हे गुरुवारी स्पष्ट झाले.