Sun, Jun 16, 2019 12:11
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › विनावेतन कार्यरत शिक्षकांची कोंडी

विनावेतन कार्यरत शिक्षकांची कोंडी

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 29 2018 10:55PMनूल : अविनाश कुलकर्णी

राज्यातील शिक्षण संस्थांमधील शिक्षकभरती राज्य सरकारने आपल्या अखत्यारीत घेतली असून, त्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेतील ‘अर्थ’पूर्ण व्यवहार बंद होतीलच शिवाय संस्थांचालकांची मनमानीला चाप बसणार आहे. त्यामुळे भावी शिक्षकांसह सर्वसामान्यांतून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या पद्धतीत मात्र विनावेतन काम करणार्‍या शिक्षकांची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   

सन 2012 पासून शिक्षण सेवक भरती बंद झाली आहे. राज्य शासनाने गेल्या दोन वर्षांपासून टीईटी परीक्षा घेऊन त्याच्या फीद्वारे भरपूर माया जमवली आहे. शिवाय त्या परीक्षेचा निकाल अत्यल्प लागला आहे. जे शिक्षक उत्तीर्ण झाले त्यांना अद्यापही नोकरी मिळाली नाही. पण पवित्र पोर्टलद्वारे होणारी निवड गुणांच्या आधारेच होणार असल्याने प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खासगी शिक्षण संस्थेच्या शाळांतील शिक्षकांची निवड आता गुणवत्तेनुसार होणार असल्याने शिक्षणाचा दर्जाही सुधारणार असल्याचे बोलले जात आहेत. 

विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने गेल्या सहा वर्षांत विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण? असाही प्रश्‍न आहे. शाळांनी व संस्थांनी भरतीसाठी शासनास कळवावे लागेल, त्यानंतर पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज मागवून परीक्षा घेतली जाईल आणि गुणवत्तेनुसार भरती करणे संस्थांना बंधनकारक असेल. वर्षातून केवळ दोनदाच ही पवित्र भरती प्रक्रिया होणार असल्याने मधल्या कालावधीत रिक्‍त झालेल्या पदावरील काम कोण करणार, असाही सवाल उपस्थित होत आहे.

तर शिक्षक भरतीत होणारा गोंधळ रोखण्यासाठी ही प्रणाली अवलंबली असली तरी तिच्या प्रामाणिक पारदर्शकता महत्त्वाची असती आणि आतापर्यंत तर ती शासन व प्रशासनामार्फत सुरू होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शिक्षणाच्या नावाने होणारा भ्रष्टाचाराचा बाजार अता बंद होणार आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांमध्ये कमालीची धास्ती पसरली आहे. तर उलटपक्षी भावी शिक्षकांच्यात मात्र आनंदाचे वातावरण दिसत असून गुणवत्तेवर होणारी भरती दर्जेदार शिक्षकांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण करणारी आहे.