Fri, Mar 22, 2019 05:32
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › सिद्धनेर्लीत गाव बंद करून निषेध

सिद्धनेर्लीत गाव बंद करून निषेध

Published On: Aug 22 2018 12:56AM | Last Updated: Aug 21 2018 11:03PMसिद्धनेर्ली : वार्ताहर

विद्यामंदिर वंदूर येथील मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्या आत्महत्याप्रकरणी सखोल चौकशी होऊन व्यवस्थापन समितीच्या पाच सदस्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी सिद्धनेर्लीत गाव बंद करून शाळेतील विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी निषेध फेरी काढली. 

 सिद्धनेर्ली बस स्थानकातून फेरीला सुरुवात झाली. मुख्य मार्गावरून मोरे यांच्या निवासस्थानी जाऊन सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. कागल पोलिस निरीक्षकांनी गावातच येऊन निवेदन स्वीकारले. त्यानंतर जमावाने मोर्चाने जाऊन तहसीलदार कार्यलय आणि पंचायत समिती कार्यलयात निवेदन दिले. या प्रकरणाची  सखोल चौकशी करून आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणीही जाऊन निवेदन देण्यात आली.

या संदर्भात वंदूर करनूर, शिक्षक संघटनांनी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, असे निवेदन दिले आहे. मोरे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या पाच जणांना कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी ताबडतोब अटक करावी, आणि अटक झाल्यानंतर गावतील कोणीही त्यांना जामीन होऊ नये. शाळेसह गावातील सर्व कर्मचार्‍यांनी कोणाचेही दडपण न घेता काम करावे, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या. यावेळी शाहीर सदाशिव निकम, विलास पोवार, कॉ. शिवाजी मगदूम, अनिल गुरव यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

दरम्यान, मुख्याध्यापक मोरे गुरूजी यांची आत्महत्या म्हणजे प्रचलित शिक्षण व्यवस्थेचा बळी आहे. मोरे कुटुंबाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कुटुंबातील एका सदस्याला तात्काळ नोकरी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही. जी. पोवार यांनी दिला.