Sat, Jul 20, 2019 23:25होमपेज › Kolhapur › प्राध्यापकाचा लैंगिक अत्याचार युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न

प्राध्यापकाचा लैंगिक अत्याचार युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Jul 26 2018 1:33AM | Last Updated: Jul 26 2018 1:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शहाजी कॉलेजमधील प्राध्यापकाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून याच कॉलेजमधील वाणिज्य शाखेच्या दुसर्‍या वर्षातील बावीस वर्षीय युवतीने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. पीडित युवतीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. संशयित प्रा. पंढरीनाथ कृष्णात पाटील (वय 33, रा. कळंबा) याला रात्री उशिरा करवीर पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित युवतीच्या कुटुंबीयासह नातेवाईकांनी करवीर पोलिस ठाण्यासह राजारामपुरी येथील खासगी रुग्णालयासमोर मोठी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता. करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलिस निरीक्षक सुनील पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली.अधिकार्‍यांनी युवतीचा जबाब नोंदविण्याचा प्रयत्न केला. तथापि, 

प्रकृती चिंताजनक बनल्याने रात्री उशिरापर्यंत जबाब झालेला नव्हता. युवतीने लिहिलेल्या सहापानी पत्रात सहा महिन्यांच्या काळात प्राध्यापकाकडून झालेल्या अत्याचाराचा तपशील नमूद केला आहे, असे पोलिस उपअधीक्षक गुरव यांनी रात्री पत्रकारांना सांगितले. पीडित युवतीच्या चुलतभावाने संशयित प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, करवीर तालुक्यातील पीडित युवती शहाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून, त्याच कॉलेजमधील विवाहित प्राध्यापक पाटील याच्याशी तिची ओळख झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राध्यापकाने युवतीशी जवळीक वाढविली.

ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसांपूर्वी प्राध्यापकाने युवतीशी संपर्क साधून साकोली कॉर्नर येथील कार्यालयात बोलावून घेतले. सकाळी साडेआठच्या सुमाराला कार्यालयात अन्य कोणीही आलेले नसल्याची संधी साधून प्राध्यापकाने खोलीत जबरदस्तीने नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचे युवतीने चिठ्ठीत नमूद केल्याचे तपासाधिकार्‍यांनी सांगितले. या घटनेनंतरही वारंवार प्राध्यापकाने शोषण केल्याचे म्हटले आहे.

प्राध्यापकाकडून झालेल्या अत्याचारामुळे नैराश्य आल्याने कीटकनाशक प्राशन करीत आहे, असेही पीडित युवतीने चिठ्ठीत नमूद केले आहे. बुधवारी सकाळी दहाच्या सुमाराला प्राध्यापकाच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या कळंबा तलावाजवळील उद्यानात युवती पोहोचली. नात्यातील तरुणाशी संपर्क साधून प्राध्यापकाकडून झालेल्या अत्याचाराची माहिती देत जीवनाचा शेवट करून घेत असल्याचे तिने सांगितले.

कळंबा तलावाजवळ आत्महत्येचा प्रयत्न

सकाळी साडेदहाच्या सुमाराला नात्यातील मुलाने युवतीशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. काही काळाने एका अनोळखी व्यक्‍तीने मोबाईल उचलला. युवतीने कीटकनाशक प्राशन केल्याने बेशुद्धावस्थेत उद्यानात पडल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तातडीने युवतीला सीपीआरमध्ये हलविण्यात आले.

चिठ्ठीतील मजकुरामुळे अत्याचाराचा प्रकार उघड

हा प्रकार समजताच युवतीचे कुटुंबीय, नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले. प्रकृती चिंताजनक बनल्याने तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. युवतीजवळ सापडलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यात सहापानी पत्र व कीटकनाशकाची बाटली आढळून आली. नातेवाईकांनी ही चिठ्ठी पोलिस अधिकार्‍यांकडे सोपविल्यानंतर लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघडकीला आला आहे, असे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले.

भेदरलेल्या प्राध्यापकाने स्वत:च गाठले रुग्णालय युवतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच संशयिताची पाचावर धारण बसली. नातेवाईकांसह काही मित्रांशी संपर्क साधण्याचा त्याने प्रयत्न केला. भेदरलेल्या स्थितीतील  प्राध्यापकाने छातीत वेदना होत असल्याचे सांगत सीपीआरकडे धाव घेतली. त्याला काहीकाळ उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले होते. डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

दबक्या आवाजात चर्चा

संशयित प्राध्यापक विवाहित असून, कळंबा येथे पत्नी, मुलासह भाड्याच्या खोलीत राहतो. या घटनेने पत्नीसह कुटुंबीयांना मोठा धक्‍का बसला आहे. कॉलेजमध्येही दिवसभर घटनेची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.