Tue, May 21, 2019 12:25होमपेज › Kolhapur › प्लास्टिकपासून तेलनिर्मिती

प्लास्टिकपासून तेलनिर्मिती

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 1:34AMकोल्हापूर : अनिल देशमुख

शहरातील ‘वेस्ट प्लास्टिक’पासून ज्वलनशील तेल तयार करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटच्या (वायसीएसआरडी) वतीने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या महिन्याभरात या प्रकल्पाचे काम सुरू केले जाणार आहे.

राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, दैनंदिन वापरातील प्लास्टिकच्या सर्वच वस्तूंना ही बंदी लागू  नाही. यामुळे कचर्‍यातील प्लास्टिकचे प्रमाण कमी होणार असले, तरी ते पूर्णपणे बंद होणार नाही.  कचर्‍याच्या रूपाने शिल्लक राहणार्‍या प्लास्टिकच्या निर्गतीकरणाचा प्रश्‍न कायम आहे. अशा प्लास्टिकच्या कचर्‍यावर शिवाजी विद्यापीठाने उपाय शोधला आहे. वापरलेले प्लास्टिक नागरिकांकडून गोळा करून, त्यापासून डिझेलसारखेच ज्वलनशील तेल त्याबरोबर अन्य उपपदार्थ तयार करण्याचा प्रकल्प साकारला जात आहे.

शहरात दररोज 165 टन कचरा तयार होतो. यापैकी 11 टक्के कचरा हा प्लास्टिकचा असतो. त्याचे विघटन होत नाही. दरवर्षी अनेक जनावरे हा कचरा पोटात जाऊन विविध आजाराने मृत्युमुखीही पडत असतात. यामुळे या कचर्‍याचे योग्य पद्धतीने, प्रदूषण विरहित विघटन होणे गरजेचे आहे. प्लास्टिकचे एक तर जाळून आणि त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर अशा दोनप्रकारे विघटन केले जाते. मात्र, या दोन्ही प्रकारात प्रदूषण होत असते. यामुळे ‘पायरोलेसिस’ या पद्धतीने प्लास्टिकचे विघटन करण्याचा प्रयोग ‘वायसीएसआरडी’ने सुरू केला आहे. त्यांनी केलेले दोन्ही प्रयोग यशस्वी झाले आहेत.
या प्लास्टिकच्या कचर्‍यापासून तेल तयार करण्यात यश आले आहे. या तेलाचे प्रयोगशाळेत परीक्षण करण्यात आले असून, त्या तेलात 39 हजार किलो ज्यूल इतकी ज्वलन क्षमता आढळून आली आहे. डिझेल तेलात ही ज्वलनक्षमता 42 ते 44 हजार किलो ज्यूल इतकी असते, त्या तुलनेत प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या या तेलात काही कमी प्रमाणात ज्वलनशीलता आढळून आली असली तरी या तेलाला औद्योगिक क्षेत्रातून चांगली मागणी आहे. सध्या 38 रुपये लिटर अशा दराने या तेलाची औद्योगिक क्षेत्राकडून खरेदी केली जात आहे.

वेस्ट प्लास्टिकपासून ज्वलनशील तेल तसेच त्याचे उपपदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या क्षमतेचा बॉयलर विकसित केला जाणार आहे. या बॉयलरचे तापमान कमी करण्यासाठी विविध उप्रेरके वापरण्यावरही विचार सुरू आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्याचे काम सध्या ‘वायसीआरडीसी’मध्ये सुरू आहे. ‘वायसीआरडीसी’चे सुधीर देसाई, डॉ. राहुल माने, डॉ. अजित कोळेकर, राहुल मेंच व चेतन गळगे हे या प्रकल्पावर काम करत आहेत. महिन्याभरात या प्रकल्पाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

प्लास्टिकपासून तेल, उपपदार्थ
जमा केलेले प्लास्टिक एका बॉयलरमध्ये 350 ते 400 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानापर्यंत आणि ऑक्सिजनविरहीत वातावरणात गरम केले जाईल. यानंतर या प्लास्टिकचे वितळून द्रवरूप तयार होईल. त्याची वाफ केली जाईल. ही वाफ पुन्हा ‘कडेन्स्’ करून त्यापासून लाईट ड्युटी ऑईल तयार केले जाईल. हे तेल, नैसर्गिक वायू किंवा कोळशापासून येणार्‍या प्राथमिक रसायनापासून तयार होते. यामुळे प्लास्टिकमध्ये कार्बनचे अणू असतात. या प्रक्रियेत तयार झालेल्या तेलासह वॅक्स् तयार करता येणे शक्य आहे. तसेच कार्बन पावडर तयार करता येईल, ही पावडर डांबरामध्ये वापरता येते.
प्लास्टिक कचर्‍यापासून मुक्ती
या प्रकल्पाद्वारे साडेतीन तासात सुमारे 150 किलो प्लास्टिकवर प्रक्रिया करता येते. त्यातून सुमारे 90 ते 100 लिटर तेलाची निर्मिती शक्य आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने यशस्वी झाला, तर त्याची क्षमता आणखी वाढवून शहरासह जिल्ह्यातील प्लास्टिक कचर्‍याच्या समस्येपासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. टायर्स उद्योगात अशाप्रकारे दररोज आठ ते दहा टन प्लास्टिक कचर्‍याचे विघटन करून तयार केलेले तेल वापरले जात आहे.

दहा लाखांचा निधी मंजूर 
मोबाईल व्हॅनचा वापर
कचरा उचलण्यासाठी मोबाईल व्हॅनचा वापर करण्याचा विचार आहे. या व्हॅनमध्ये जागेवरच मिळालेले प्लास्टिक इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने वितळून त्यानंतर ते बॉयलरपर्यंत नेता येईल, असा प्रयत्न केला जाणार आहे. 

तेल, नैसर्गिक वायू किंवा कोळशापासून येणार्‍या प्राथमिक रसायनापासून तयार होते. यामुळे प्लास्टिकमध्ये कार्बनचे अणू असतात. या प्रक्रियेत तयार झालेल्या तेलासह वॅक्स् तयार  करता येणे शक्य आहे.