Sat, Jun 06, 2020 06:13होमपेज › Kolhapur › जाओ, पहले मल्ल्या, नीरव, चोक्सी का कर्ज वसूल करो?

जाओ, पहले मल्ल्या, नीरव, चोक्सी का कर्ज वसूल करो?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : राजेंद्र जोशी

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि चोक्सी या बड्या कर्जदारांनी देशातील वित्तीय संस्थांना चुना लावून परदेशात पलायन केल्याने आर्थिक वर्ष संपताना मार्चअखेरीस कर्जाची थकबाकी वसुली करताना छोट्या वित्तीय संस्थांची डोकेदुखी बनली आहे. बडे कर्जदार गंडा घालून राजरोसपणे पळून जातात आणि छोट्या कर्जदारांच्या पाठीमागे वसुलीचा ससेमिरा लागतो, अशी मानसिकता छोट्या कर्जदारांत पसरते आहे. परिणामी प्रथम मल्ल्या, नीरव मोदी आदींची कर्जे वसूल करा आणि मग आमच्या दारात या, असा उद्विग्न सल्ला ऐकण्याची वेळ वसुली पथकावर येऊन ठेपली असून कर्जवसुलीचा उद्दिष्टांक कसा पूर्ण करायचा, असा यक्षप्रश्‍न वसुली पथकापुढे उभा आहे.

राज्यामध्ये आर्थिक वर्षाअखेरची चाहूल नेहमी नव्या वर्षारंभी होते. जानेवारी उजाडला, की बँकांची वसुली पथके थकबाकी गोळा करण्यासाठी कर्जदारांचे उंबरे झिजवण्यास सुरुवात करतात. या प्रयत्नांमध्ये कधी वसुली पथकांवर हल्ले होतात, तर काही मध्यस्थांमार्फत दबावही टाकला जातो. यंदा मात्र, या पथकांच्या गाठीशी नवा अनुभव बांधला गेला आहे. 

गेल्या वर्षात लिकरकिंग विजय मल्ल्या याने हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशी पलायन केले आणि आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात पंजाब नॅशनल बँकेत नीरव मोदी व चोक्सी यांनी हजारो कोटींचा गंडा घातल्याचे निदर्शनास आले. हे कर्जदार रूबाबात वावरतात, वित्तीय संस्था त्यांना पायघड्या घालतात आणि घोटाळ्यानंतरही ते सहीसलामत परदेशात पळून जातात, अशी स्थिती समोर आल्याने सर्वसामान्य कर्जदारांत संतापाची भावना आहे. ही भावना आता संतप्त प्रतिक्रियेच्या रुपाने बँकांच्या वसुली पथकांना ऐकावी लागते आहे. काही ठिकाणी वसुलीवर परिणाम होत असून बड्याचे घोटाळे आणि छोट्यांना त्रास, अशी या पथकांची अवस्था झाली आहे.

वसुली पथके निरुत्तर

वास्तविक पाहता ज्या कर्जदारांच्या दारामध्ये वसुली पथके दाखल होतात, त्यांची कर्ज रक्कमही लाखाच्या आत-बाहेर असते. सर्वसाधारणपणे सहकारी बँकांचे हे कर्जदार असतात. राष्ट्रीयीकृत बँका त्यांना दारात उभे करून घेत नाहीत, म्हणून केविलवाण्या परिस्थितीत ते सहकारी बँकांकडे जातात आणि बँकही त्यांचा आश्रयदाता बनते. या कर्जाची थकबाकीही पाच-दहा हजारांच्या बाहेर नसते. पण कोल्हापुरात अलीकडे आपल्या व्यक्तिगत छोट्या गोष्टींबरोबर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संबंध जोडण्याची जणू एक फॅशन झाली आहे. सहकारी बँकांनी दिलेल्या कर्जाशी मल्ल्या-मोदींचा काही एक संबंध नसतो. पण संताप व्यक्त करायला कारण मिळते आणि नेमके हेच कारण आता वसुली पथकांना निरुत्तर करण्यास पुरेसे ठरते आहे.

 

Tags : kolhapur, kolhapur news, outstanding loans, financial institutions, 


  •