होमपेज › Kolhapur › खासगी क्षेत्रातील पेन्शनधारकांची थट्टा थांबवा

खासगी क्षेत्रातील पेन्शनधारकांची थट्टा थांबवा

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 17 2017 12:38AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विठ्ठल पाटील

माजी आमदार, खासदार यांच्यासह केंद्र व राज्याच्या निवृत्त कर्मचार्‍यांपैकी बहुतेकांना प्रतिदिन एक ते दीड हजार रुपयांची पेन्शन मिळत असताना खासगी क्षेत्रातील सेवानिवृत्तांना मात्र तेवढीच पेन्शन दर महिन्याला मिळते आहे. पेन्शनधारकांच्या रकमेतील ही तफावत सामाजिक असमतोल ठरत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. प्रतिमहिना पाचशे ते दीड हजार रुपयांची पेन्शन देऊन खासगी क्षेत्रातील पेन्शनधारकांची थट्टा थांबवावी आणि त्यात वाढ करावी, अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जात आहे.

अर्थमंत्रिपदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग असताना 1995 मध्ये देशभरातील खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी नवीन पेन्शन योजना सुरू केली. या नवीन ‘ईपीएस’नुसार फॅमिली पेन्शन योजनेचा लाभ मिळू लागला; पण भविष्य निर्वाह निधीला मोठ्या प्रमाणात कात्री लावली गेली. या योजनेपूर्वी कर्मचार्‍यांना स्वतःच्या निधीएवढीच रक्कम मालकांकडून फंडामध्ये जमा होत होती. नव्या योजनेनंतर कर्मचार्‍यांच्या निधीएवढाच निधी मालकाचा असला, तरी त्यातील मोठा हिस्सा सरकारी तिजोरीत जमा होऊ लागला. या नव्या योजनेपासून खासगी क्षेत्रातील सेवानिवृत्तीधारकास 500 ते दीड हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू लागली. आज 22 वर्षे होऊनदेखील या पेन्शन धोरणात किंचितही बदल झालेला नाही. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर खासगी क्षेत्रातील कामगार अक्षरशः आर्थिकदृष्ट्या पिचला जात आहे.

नव्या योजनेला 16 नोव्हेंबर 2017 रोजी 22 वर्षे पूर्ण झाली; पण सेवानिवृत्तीधारकांना 2,200 रुपये पेन्शन प्रतिमहिना मिळू शकली नाही, अशी खासगी क्षेत्रातील कामगारांची खंत आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांचा विचार होत नसल्याने असंतोष व्यक्त होत आहे. उतार वयात अनेक व्याधींनी त्रस्त असताना उपचारासाठी आणि औषधोपचारासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत असल्याची तक्रार या निवृत्तीधारकांची आहे.