Thu, Aug 22, 2019 12:56होमपेज › Kolhapur › खासगी कारखान्यांच्या तोडणी, वाहतूक खर्चावरच प्रश्‍नचिन्ह!

खासगी कारखान्यांच्या तोडणी, वाहतूक खर्चावरच प्रश्‍नचिन्ह!

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 10 2018 11:12PMकुडित्रे : प्रा. एम. टी. शेलार

अलीकडे एका खासगी साखर कारखान्याने एफ.आर.पी. अधिक 100 रुपये ताबडतोब 14 दिवसांत व 100 रुपये दोन महिन्यांनंतर अशा  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या साक्षीने ठरलेल्या फॉर्म्युल्यालाच टाच दिली. प्रथम आश्‍वासित दराप्रमाणे उचल दिली. पुढे गट्टी करून सर्वांबरोबर 2500 रुपये उचल दिली. तगादा लावल्याबरोबर एफ.आर.पी. दिली, तीही दोन टप्प्यात. सर्वांवर कडी म्हणजे प्रथम आश्‍वासित दराप्रमाणे दिलेल्या  (एफ.आर.पी. पेक्षा अधिक) रकमेची वसुली सुरू केली आहे.

दिलेला दर वसूल करण्याचा साखर कारखानदारीच्या इतिहासातील पहिलाच प्रयोग होता. यामुळे खासगी कारखानदारांच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. अगोदर सरासरी साखर उतारा घटवून व तोडणी वाहतूक खर्च वाढवून एफ.आर.पी. मारायची. ऊस मिळवण्यासाठी आश्‍वासने देऊन एफ.आर.पी. पेक्षा जादा दर द्यायचा व पुढे वसूल करायचा, असा घातक पायंडा पडण्याची शक्यता आहे.

रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला नावालाच!

केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने निश्‍चित केलेली एफ.आर.पी. उचित व लाभकारी मूल्यही साखर कारखान्यांच्या गत हंगामातील सरासरी साखर उतार्‍यावर अवलंबून असते. एफ.आर.पी. ही एक्स फिल्ड असल्याने कारखानदारांनी ऊस उत्पादकांना उसाची तोड झाल्यापासून 14 दिवसांच्या आत द्यावयाची वैधानिक पहिली उचल ही त्या त्या कारखान्याच्या गत हंगामातील सरासरी  तोडणी वाहतूक खर्चावर अवलंबून असते. म्हणजे कारखान्याचा सरासरी  उतारा  आणि  तोडणी वाहतूक खर्च  हे दोन घटकच  उसाच्या किमतीचे निर्धारक  आहेत. अलीकडे  रेव्हेन्यू शेअरिंग  फॉर्म्युल्यामुळे साखरेच्या किमती आणि कारखान्याचा प्रक्रिया खर्च व उपपदार्थांच्या किमती या 70 : 30 / 75 : 25 या सूत्रामध्ये उसाच्या अतिरिक्‍त दराशी निगडित आहेत.

तोडणी वाहतूक खर्च कळीचा मुद्दा!

एफ.आर.पी. ही  एक्स गेट  (कारखाना दरात ऊस पोहोच दर) असल्यामुळे पहिली उचल ठरताना त्या कारखान्याच्या  ग्रॉस (ढोबळ) एफ.आर.पी. तून त्या कारखान्याचा गत हंगामातील सरासरी तोडणी वाहतूक खर्च वजा जाता येणारी रक्‍कम म्हणजे वैधानिक किमान पहिली उचल ही 14 दिवसांच्या आत (उसाची तोड झाल्यापासून) ऊस उत्पादकाच्या
बँक खात्यावर जमा करावी लागते. यात कसूर झाल्यास थकीत रकमेवर 15 टक्के दराने व्याजाची आकारणी होते. 

दोन कारखान्यांमध्ये तफावत का?

फारसे खोलात न जाता कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील एका खासगी व सहकारी कारखान्यांचे 2016-17 च्या हंगामातील साखर उतारे अनुक्रमे 12.72 टक्के व 12.76 टक्के होते, तर तोडणी वाहतूक खर्च अनुक्रमे प्रतिटन 625 रुपये व 542 रुपये आहे. अगदी भौगोलिक सान्‍निध्य, समान कार्यक्षेत्र आणि समान अंतरावरून ऊस येत असतानाही खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या तोडणी वाहतूक खर्चात तफावत का? हे न उलगडणारे कोडे आहे. प्रथम या खासगी कारखान्याने ऊस तुटल्यावर सात दिवसांत बिले देऊन लौकीक मिळवला, पण आता एफ.आर.पी.लाच टाच दिली.