होमपेज › Kolhapur › कैदी करणार बड्या कंपनीत नोकरी

कैदी करणार बड्या कंपनीत नोकरी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


कोल्हापूर : दिलीप भिसे

खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात आजन्म कारावास भोगणार्‍या कळंबा कारागृहातील शंभरावर कैद्यांना फाईव्ह स्टार एमआयडीसीमधील एका बड्या कंपनीत रोजगाराची संधी प्राप्‍त झाली आहे. कारागृह प्रशासन आणि कंपनी करारानुसार प्रशिक्षित कैदी एक डिसेंबरपासून बंद कोठडीच्या विश्‍वात राहूनही जीवनाची दुसरी इनिंग सुरू करणार आहेत.

कैदी सुधारणा, पुनर्वसन योजनेंतर्गत कारागृह प्रशासनांतर्गत प्रथमच हा महत्त्वाकांक्षी उपक्रम कोल्हापुरात राबविला जात आहे. गृह खात्याने विनाविलंब प्रस्तावाला मान्यता दिली आहे. शिक्षेचा कार्यकाल पूर्ण होताच स्वत:च्या पायावर उर्वरित आयुष्य कुटुंबीयांसमवेत व्यतीत करण्याचा भाग म्हणून व्यावसायिक प्रशिक्षणाचे त्यांना धडे देण्यात येत आहेत.  125 एकरांच्या क्षेत्रात वसलेल्या कळंब्यात पुरुष (1,755), महिला (34) अशी एकूण 1 हजार 789 कैद्यांची क्षमता आहे. त्यात गंभीर गुन्ह्यांत दोष निश्‍चिती झालेल्या 1 हजार 272  कैद्यांचा समावेश आहे. दोष सिद्ध 1 हजार 223 जणांमध्ये खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात हे कैदी जन्मठेप भोगत आहेत.

कारावास भोगत असताना झालेल्या शिक्षणाचा फायदा मिळावा, या हेतूने व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. गतवर्षी प्रशिक्षण पूर्ण झालेल्या शंभरावर कैद्यांना कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. सकाळी 8 ते 4 आणि सायंकाळी 4 ते 12 अशा शिफ्टमध्ये त्यांची ड्युटी लागणार आहे. स्वतंत्र सुरक्षा पथकासमवेत वाहनातून ने-आण होईल. ड्युटी होताच पुन्हा कारागृहात रवानगी केली जाईल.