Sun, Mar 24, 2019 22:56
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › फौंड्री उद्योगातही कैदी पारंगत

फौंड्री उद्योगातही कैदी पारंगत

Published On: Jun 25 2018 1:48AM | Last Updated: Jun 25 2018 12:02AMकोल्हापूर : दिलीप भिसे

ज्या हाताने रक्‍तपात घडला... चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा चिरला. जमीन वादातून मुडदे पाडले... राजकीय सुडातून काटा काढला... आयुष्याला अनपेक्षित कलाटणी देणारे कर्म ज्या हातून घडले, आज तेच कलंकित हात जहाज, कंटेनर, ट्रॅक्टरसह विविध अवजड, सुट्या पार्टला आकार देण्यात गुंतले आहेत. होय... कारावासाचा भोग आलेले अडीचशेवर कैदी आज, स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. कळंबा कारागृहातील ‘फौंड्री’त त्यांना रोजगार मिळाला आहे.सश्रम कारावास भोगल्यानंतर नको तितक्या उपेक्षा वाट्याला येतात. सारेच दूर झाल्याने एकाकी जीवन, नैराश्य, मनस्तापातून पुन्हा गुन्हेगारीचा विळखा... कालचक्र रोखण्यासाठीच कैदी पुनर्वसनासाठी धडपड सुरू झाली आहे. बहुतांशी कारागृहात व्यावसायिक प्रशिक्षण देणारी सेंटर निर्माण झाली आहेत.

दोन दर्जेदार फौंड्रींची उभारणी

कैदी सुधारणा योजनेंतर्गत शासकीय टेक्निकल प्रशिक्षण केंद्राच्या सहयोगातून एका बड्या औद्योगिक कंपनीशी करार करून कारागृहात दोन एकरांत ‘पंचतारांकित’ वसाहतीपेक्षाही सरस दोन फौंड्रींची उभारणी करण्यात आली आहे.

नक्षलवादीही रमले फौंड्रीत!

शासकीय टेक्निकल प्रशिक्षित अडीचशेवर कैद्यांना फौंड्रीत रोजगार मिळाला आहे. सकाळी, सायंकाळ दोन सत्रात चालणार्‍या फॅक्टरीत जहाज, कंटेनरसह विविध प्रकारचे चाळीसवर सुट्या पार्टची निर्मिती केली जाते. बॉम्बस्फोटातील आरोपी, नक्षलवादी टोळ्यासह गंभीर गुन्ह्यात कारावास झालेल्या कैद्यांचा समावेश आहे. 

शासन तिजोरीत पडतेय 75 लाखांची भर

कंपनीकडून कारागृहाला 200 रुपये मेहनतानापोटी दिले जातात. त्यापैकी कैद्याला पगारापोटी 61 रुपये, 50 रुपये तंत्रनिकेतन,10 टक्के बंदी कल्याण योजना, उर्वरित रक्‍कम शासनाकडे जमा केली जाते. गेल्या वर्षात किमान 75 लाखांचा महसूल तिजोरीत जमा झाला आहे.

महिला कैद्यांनी बनविले दोन कोटींचे लाडू

कारागृहात शिक्षा भोगणार्‍या साठवर महिलांना लाडू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. योगायोगाने हे लाडू पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला पुरविण्यात येत आहेत. वर्षभरात दोन कोटी रुपयांचे 20 लाख लाडूचा पुरवठा झाला आहे. त्यातूनही शासनाला 90 लाखांचा महसूल मिळाला आहे. या महिला बंदींचा समितीमार्फत साडी-चोळी देऊन गौरव करण्यात आला.

यंत्रमाग कामगार अन्रात्रंदिवस खडखडाट

कारागृहातील 65 यंत्रमागावर 30 बंदीजण तीन शिफ्टमध्ये काम करीत असतात. त्यामुळे रात्रंदिवस खडखडाट सुरू असतो. टॉवेल, चादर, बेडसीट, रूमाल, शालेय, पोलिस गणवेशसाठी लागणार्‍या कापडांचीही इथे निर्मिती होते. आकर्षक, डिझायनच्या साड्याही बनविल्या जातात. 

काश्मिरी कलेचा आविष्कार

जम्मू-काश्मीर येथील सात-आठ कैदी कळंबा कारागृहात आजन्म कारावास शिक्षा भोगत आहेत. 50-60 वयोगटातील बंदीजणांची सहावारी साड्यावरील आकर्षक कलाकुसर नजरेत भरणारी आहे. नक्षीकाम, डिझायनदार साड्यांना मोठी मागणी असते. जिल्ह्यातील दोन वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सौभाग्यवतींनी कैद्यांनी हातावर बनविलेल्या साड्या डझनावर खरेदी केल्या आहेत. बाजारपेठात याच साड्यांना किमान पंधरा ते वीस हजारांवर दर मिळतो. काश्मिरी कलेचा आविष्कार अनुभवाला येतो.    

बाळाचा नामकरण सोहळा अन् ‘मामा’चा उत्साह

दीड वर्षापूर्वी मार्केट यार्डातील एका खुनाच्या गुन्ह्यात दाम्पत्यांना अटक झाली. गर्भवती असलेल्या संशयित महिलेची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली. महिला बराकीमध्ये तिचे वास्तव्य असतानाच मध्यरात्रीला तिची प्रसूती झाली. अन्य महिला कैद्यांनी सुश्रूषा केली.त्यानंतर दोन महिन्यांनी कारागृहात गोंडस बाळाच्या नामकरणाचा समारंभ झाला. कारागृहातील सर्वच कैद्यांनी एकत्रितपणे सोहळा साजरा केला. चिमुरडी सकाळपासून मामा लोकांच्या अंगा-खांद्यावरून फिरत असते. मुलीला कैदीच नव्हे तर अधिकारी, कर्मचार्‍यांनाही लळा लागलेला आहे.