Fri, Mar 22, 2019 07:41होमपेज › Kolhapur › औषध घोटाळ्याचा अहवाल शासनाकडे सादर

औषध घोटाळ्याचा अहवाल शासनाकडे सादर

Published On: Apr 25 2018 12:56AM | Last Updated: Apr 24 2018 10:23PMकोल्हापूर : प्रतिनिधी

औषध खरेदी घोटाळ्यात दोषी आढळलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांच्यावर गंभीर शिक्षेची तर औषध निर्माण अधिकारी बी. डी. चौगुले यांची खातेनिहाय चौकशीची शिफारस जिल्हा परिषदेकडून शासनाकडे करण्यात आली आहे. सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांच्या आदेशाने मंगळवारी चौगुले यांना कलम 6/3 नुसार ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आली आहे. या घोटाळ्यास हातभार लावलेल्यांपैकी आरोग्य विभागातील चौघेही कारवाईच्या कक्षेत आले आहेत. याचवेळी वित्त विभागातील चौघांवर मात्र प्रशासनाने मेहरनजर दाखवली असून त्यांना जाणीवपूर्वक वगळल्याची कुजबूज जिल्हा परिषदेत सुरू आहे.

आरोग्य विभागात गेल्या दोन वर्षांत औषध खरेदीत तब्बल 66 लाखांचा घोळ दिसत असल्याचे अतिरिक्‍त जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या चौकशी अहवालात निष्पन्‍न झाले. याशिवाय अतिरिक्‍त आणि अनावश्यक खरेदी झाल्याचेही समोर आले. या सर्व प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील व औषध निर्माण अधिकारी बी. डी.चौगुले यांचाच सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सीईओंनी या दोघांनाही सक्‍तीच्या रजेवर पाठवले. त्यांना पाठवलेल्या खुलाशा नोटिसीनंतर वित्त विभागाने फेरपडताळणी करून सामान्य प्रशासन व आरोग्य विभागाच्या अभिप्रायानंतर अंतिम अहवाल सीईओंकडे सादर केला. डॉ. पाटील यांच्यावर या अहवालात गंभीर आरोप ठेवण्यात आले. ते राजपत्रित अधिकारी असल्याने त्यांच्यावरील कारवाईसंबंधी आरोग्य उपसंचालकांमार्फत प्रधान सचिवांकडे त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांना गंभीर शिक्षा व्हावी, अशी शिफारस प्रस्तावामध्ये जि.प.कडून करण्यात आली आहे.

आरोग्य अधिकार्‍यांबरोबर औषध निर्माण अधिकारी बी.डी.चौगुले यांच्याबाबतही खातेनिहाय चौकशीसाठी विभागीय आयुक्‍तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. चौकशी सुरू करण्यापूर्वी त्यांना आणखी एकदा नोटीस लागू करण्यात आली आहे. ही चौकशी झाल्यानंतर त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया होणार आहे. दरम्यान, या दोघांसह आरोग्य विभागातीलच विद्या व्हटकर, बर्डे, उदय गोडवे, बी. डी. चौगले यांच्यावर ठपका ठेवत त्यांनाही कारवाईच्या कक्षेत घेण्यात आले आहे. त्यांना अजून नोटिसा लागू केल्या नसल्या तरी ती काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

Tags : Kolhapur, Presenting, report,  drug, scam,  government