Tue, Jul 16, 2019 09:38होमपेज › Kolhapur › शिवराज्याभिषेकासाठी मानकर्‍यांची जय्यत तयारी

शिवराज्याभिषेकासाठी मानकर्‍यांची जय्यत तयारी

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 20 2018 12:36AMकोल्हापूर : सागर यादव 

शेकडो वर्षे परकीय गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्रातील मराठी मनात स्वातंत्र्याची भावना जागविण्या बरोबरच बलाढ्य शाह्यांना कडवे आव्हान देत रयतेचे स्वतंत्र- सार्वभौम स्वराज्य निर्माण करण्याचे अद्वितीय कार्य शिवछत्रपतींनी केले. अशा या राज्याचा सर्वोच्च क्षण म्हणून देशाच्या इतिहासात रायगडावरील शिवराज्याभिषेक (6 जून 1674) सोहळ्याची नोंद आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सेवा देणे प्रत्येकाला अभिमानास्पद आहे. यामुळे 6 जून रोजी रायगडावर होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्याला विविध प्रकारच्या मानकर्‍यांची अलिखीत परंपरा निर्माण झाली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे हे मानकरी आतापासूनच सज्ज झाले आहेत. 

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने रायगडावर 5 व 6 जून या कालावधीत शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडासह पायथा, पंचक्रोशी आणि एकूणच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नियोजनाची लगबग सुरू असते. गड स्वच्छता, वास्तू सुशोभिकरण इथपासून धार्मिक विधी, सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक प्रथा आणि अन्‍नछत्रपर्यंतच्या बारीक-सारीक गोष्टींचे नियोजन यानिमित्ताने केले जाते.   

रायगडावर गेल्या 20-25 वर्षांपासून सुरू असणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्याला लोकोत्सव आणि राष्ट्रीय सणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या समारंभात येणार्‍या लाखो शिवभक्‍तांच्या नियोजनासाठी अ.भा. शिवराज्याभिषेक महोत्सव समितीला विविध क्षेत्रांतील व्यक्‍ती-संस्था-संघटनांच्या वतीने यथाशक्‍ती पाठबळ देऊन सहकार्य केले जाते. अनेक संस्था-संघटनांनी राज्याभिषेक सोहळ्याच्या सुरुवातीपासूनच विविध सेवा आणि जबाबदार्‍यांच्या मान-सन्मानाची परंपरा अखंड राखली आहे. 

समितीचे प्रमुख आणि रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष  खा. संभाजीराजे छत्रपती आणि सौ. संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली या जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडल्या जातात. 

विविध मान-सन्मान असे...
स्वागत समिती, ध्वज समिती, सासनकाठी, नगारा वादन, तलवार, गड सजावट, नाम ओढण्याचा मान, देशभरातील पवित्र ठिकाणे आणि महाराष्ट्रातील गडकोटांवरून अभिषेकासाठी पाण्याचा मान, शिवकालीन युद्धकला व शिवशाहिरी पोवाड्यांचे सादरीकरण, ध्वज लावण्याचा मान, औक्षणाचा मान, ढोल -ताशा पथक, तुतारी-रणहलगी-कैचाळ यांसह पारंपरिक वाद्यांचा मान, घोड्याचा मान, पालखीचा मान, गडदेवता शिरकाइला गोंधळाचा मान, अन्‍नपूर्णा मान, शिवभक्‍तांसाठी भाजीपाल्याचा मान, राज्याभिषेकासाठीच्या सुवर्ण नाण्यांचा मान असे विविध प्रकारचे अनेक मान लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारले आहेत. महत्त्वाचे म्हणजे सर्व जाती-धर्मियांकडून रयतेचा राजा शिवछत्रपतींची सेवा अत्यंत अपुलकीने बजावली जाते.