होमपेज › Kolhapur › 37 कोटींचे शिलकी अंदाजपत्रक सादर

37 कोटींचे शिलकी अंदाजपत्रक सादर

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचा 2018-19 चा 37 कोटींचा शिलकी अंदाजपत्रक गुरुवारी सभागृहात सादर करण्यात आला. शिक्षण, आरोग्य, कृषी, दिव्यांग व मागासवर्गीयांवर विशेष मेहरनजर असणार्‍या या अंदाजपत्रकात नावीन्यपूर्ण योजनांची अक्षरशः बरसात करण्यात आली आहे. राष्ट्रपुरुष, वैज्ञानिक, साहित्यिक, समाजसुधारकांच्या नावाने तब्बल वीसभर नवीन योजनांची घोषणा करण्यात आली आहे. सदस्यांचा स्वनिधी 1 लाखाने वाढवून तो 6 लाख रुपये करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 

अर्थ समिती सभापती अंबरीश घाटगे यांनी आपला पहिला अर्थसंकल्प गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आपल्या खास शैलीत सादर केला. गावांचा पर्यायाने ग्रामीण जनतेचा विकास केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्पाची मांडणी करण्यात आली. याबद्दल सभागृहात सीईओ, कॅफो, वित्त विभागासह सूचना देणार्‍यांचे अभिनंंदन करण्यात आले. 2018-19 चे मूळ अंदाजपत्रक 37 कोटी 76 लाख 55 हजारांचे असून त्यात 58 हजार 101 रुपये इतकी शिल्‍लक रक्‍कम आहे. 36 कोटी, 23 लाख, 69 हजार, 600 रुपयांच्या तरतुदी 7 कोटी, 46 लाख, 87 हजार, 600 रुपयांचा गेल्या वर्षीचा अखर्चित निधीही समाविष्ट करण्यात आला आहे. यावर्षी 12 कोटींचे व्याज प्राप्‍त झाले आहे. मुद्रांक शुल्क स्वरूपात 8 कोटी, 5 लाख, 43 हजार तर उपकर स्वरूपात 9 कोटी, 43 लाख, 20 हजार, 976 रुपये अनुदान प्राप्‍त झाल्याने गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अंदाजपत्रक 9 कोटींनी जास्त झाले आहे. 

अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना प्रा. शिवाजी मोरे, हेमंत कोलेकर, राहुल आवाडे, वंदना जाधव, प्रवीण यादव, हंबीरराव पाटील, राजवर्धन निंबाळकर, सचिन बल्‍लाळ, बजरंग पाटील, मनोज फराकटे, सतीश पाटील यांनी सूचना मांडल्या. यात अध्यक्ष सहाय्य निधी उभारणे, नगरपालिका आवारातील शाळांना शिक्षण कर लावणे, मागासवर्गीयांना घर दुरुस्ती, कृषी अनुदान 50 वरून 75 टक्के, सर्पदंशाची लस पुरवठा करावा आदी सूचना मांडण्यात आल्या. 

उत्पन्‍नवाढीवर विशेष भर

अर्थसंकल्पात उत्पन्‍न वाढीवर विशेष भर देण्यात आला असून, प्रसंगी इमारती बांधण्यासाठी शासनाकडून कर्ज घेेण्याचीही तयारी ठेवण्यात आली आहे. यामध्ये सातारा जि.प. च्या धर्तीवर बांधकाम साहित्य प्रयोगशाळा उभारण्याचा व पालकमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याचेही ठरले आहे. यात प्रयोगशाळेतून 80 लाखांचे उत्पन्‍न अपेक्षित धरण्यात आले आहे. याशिवाय जि.प. आवारात एटीएम सेंटर सुरू करून 20 लाख भाडे मिळण्याचेही नियोजन केले आहे. तसेच जि.प. मालकीच्या जागेत दुकानगाळे उभारून ते भाड्याने देऊन त्यातून 20 लाखाचे उत्पन्‍न अपेक्षित धरण्यात आले आहे. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, Presentation,  balance budget, 37 crores,  Kolhapur Zilla Parishad