Tue, Mar 19, 2019 20:27होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी

जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी

Published On: May 28 2018 1:42AM | Last Updated: May 28 2018 12:29AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पूर्वमोसमी पावसाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत रविवारी (दि.27) हजेरी लावली. रोहिणी नक्षत्राच्या मुहुर्तावर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान,  कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील रजपूतवाडीनजीक रविवारी सायंकाळी वडाचे मोठे झाड कोसळले. झाडाने पूर्ण रस्ता व्यापल्याने वाहतूक ठप्प झाली. पाउण तासाच्या परिश्रमानंतर आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

रविवारी दुपारी चारच्या सुमारास  शहरात सुरू झालेला पाऊस साधारणपणे एक तास पडला. ग्रामीण भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. या पावसामुळे उसाला पाणी देण्याचे शेतकर्‍यांचे श्रम वाचणार आहेत. त्याचबरोबर खरिपाच्या मशागतीलाही वेग आला आहे. रोहणी नक्षत्रापूर्वी भाताची धुळवाफ पेरणी केली जाते. त्यासाठी गेले पंधरा दिवस जिल्ह्यात शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. रविवारी ऐन रोहिणी नक्षत्राच्या मुहुर्तावरच पाऊस पडल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. 

खरीप हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त असला तरी काहीठिकाणी उन्हाळी भात, भुईमुग, मका यांची काढणी सुरू असल्याने त्यास हानीकारक ठरत आहे. मळणीचे आणि धान्य वाळवण्याचे काम सुरु असतानाच  पाऊस पडत असल्याने शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. रजपूतवाडीनजीक वडाचे झाड दुपारी साडेचारच्या सुमारास कोसळले. सुदैवाने रस्त्यावरील कोणत्याही वाहनाचे नुकसान झाले नाही. मात्र, रस्त्या व्यापल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाला  माहिती मिळताच जेसीबी, कटरसह पथक रवाना झाले. सुमारे पाउण तासानंतर झाडाचा बहुतांश भाग बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरू झाली. 

वडणगे : रविवारी झालेल्या वादळी वारा, गारांसह झालेल्या पावसाने रजपूतवाडी (ता. करवीर) येथील पंचवीसहून अधिक घरांचे कौले व पत्रे उडाले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. येथील कृष्णात आनंदा चव्हाण यांच्या किराणा दुकानाची पत्रे उडाले. चिखली नवीन वसाहत येथील अशोक चौगले यांच्या घराचे पत्रे सुमारे दोनशे फूट उडून  रस्त्यावर पडले.  आनंद पवार, नीलेश  चौगले, माधुरी केसरकर, विलास झांजगे, आर के कांबळे, भारत  फडतारे,  रेखा  खोत, आबिद  मुल्लाणी, अशोक माने, शंकर लोहार, भिमराव  सुतार, काशिनाथ  माने, सोमनाथ  माने, कृष्णात  माने, भिकाजी  पोवार, सदाशिव  पिसाळ, सुनिता  कांबळे, युवराज कांबळे, सहदेव कांबळे, लक्ष्मण कांबळे, चंद्रकांत  कांबळे यांच्या घरांचे  नुकसान झाले.

वीजपुरवठा खंडित

उचगाव : येथे व परिसरात रविवारी सायंकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. टेंबलाई उड्डाणपुल ते उचगाव जकात नाक्यादरम्यान पाच ते दहा झाडे कोसळली. मनपा कर्मचार्‍यांनी त्वरित झाडांच्या फांद्या तोडून वाहनांना मार्ग करून दिला.  वार्‍यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. उचगाव उड्डाण पुलाखाली पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प  झाली.