Sun, Jul 21, 2019 01:24होमपेज › Kolhapur › निवडणूक महापौरपदाची पेरणी विधानसभेची

निवडणूक महापौरपदाची पेरणी विधानसभेची

Published On: May 26 2018 1:18AM | Last Updated: May 25 2018 11:42PMकोल्हापूर : सतीश सरीकर

महापालिका पदाधिकारी निवडीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांना प्राधान्य देत आ. सतेज पाटील यांनी पुतण्या ऋतुराज पाटील यांच्यासाठी विधानसभेसाठी ‘कोल्हापूर उत्तर’मधून पेरणी केल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूर शहर हा तसा शिवसेनेचा बालेकिल्‍ला. माजी आमदार मालोजीराजे यांचा अपवाद वगळता येथे सातत्याने शिवसेनेचाच भगवा फडकला आहे. असे असले तरी महापालिका राजकारणात मात्र शिवसेनेला विधानसभा यशाची पुनरावृत्ती करता येत नाही, हेही वास्तव आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीतही मतदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचा कौल दिला. साहजिकच नगरसेवकांच्या माध्यमातून शहरात काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्राबल्य वाढले. 

महापालिका निवडणुकीपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पाळेमुळे घट्ट करताना दिसत आहेत. विशेषत: आ. सतेज पाटील यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांची ही राजकीय ‘फिल्डिंग’ पुतण्या ऋतुराज यांच्यासाठी  असल्याचे बोलले जात आहे. शोभा बोंद्रे यांच्या महापौर निवडीनंतर तर  ‘निवडणूक महापौरपदाची अन् पेरणी विधानसभेची’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आले. दोन अपक्षांनी साथ दिल्याने त्यांचे संख्याबळ 29 झाले आहे. राष्ट्रवादीचे 15 नगरसेवक आहेत. अशाप्रकारे तब्बल 44 नगरसेवक पाटील यांच्या छावणीत आहेत. याचा राजकीय फायदा उठवत ऋतुराज यांच्यासाठी मतदारसंघात गेल्या दोन वर्षांपासून वातावरण तयार केले जात आहे. आ. पाटील यांचे कसबा बावडा परिसरावर वर्चस्व आहे. सहा नगरसेवक असलेला कसबा बावडा म्हणजे त्यांचा हक्‍काचा मतदारसंघ आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात दोन लाख 85 हजार मतदार असून त्यातील सुमारे पस्तीस हजारांवर मतदार बावड्यात आहेत. त्याचा फायदाही विधानसभेत ऋतुराज पाटील यांना होऊ शकतो, असे राजकीय जाणकारही मानतात.

चार महिन्यांपूर्वी स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी बंडखोरी करून विरोधी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. त्यात शिवाजी पेठेतील एका नगरसेवकाचा समावेश होता. त्यामुळे राजकीय वातावरण कलुषित झाले होते. बोंद्रे यांना संधी देऊन शिवाजी पेठेतील मतभिन्‍नता संपवत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांतील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून मंगळवार पेठेसह गावठाणातील प्रत्येक तालमीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविला जात आहे. त्यातूनच त्यांच्या 
भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट होत आहे. 

2014 मध्ये विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर राजकीयदृष्ट्या अज्ञातवासात गेलेले सतेज पाटील यांना महापालिका निवडणूकीने उभारी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाल्याने आ. पाटील यांनी विधान परिषदेतील आमदारकी मिळवणे शक्य झाले. त्यातून ते पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय झाले.त्यांनी  आता  ‘कोल्हापूर उत्तर’वरही लक्ष केंद्रीत केले आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून शहरात कार्यकत्यार्ंची बांधणी करत ‘व्होट बँक’ तयार करण्यावर भर  दिला जात आहे. भविष्यात महापौरपदाबरोबरच इतर पदाचीही संधी शहरालाच देऊन या मतदारसंघात ऋतुराज यांच्या उमेदवारीचा दावा  बळकट करण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.  

उमेदवारी काँग्रेस की राष्ट्रवादीतून

विधानसभा निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार हे जवळजवळ स्पष्ट आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ  काँग्रेसकडे आहे. तेथून आ. सतेज पाटील हेच रिंगणात असणार आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादीकडे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी  सक्षम उमेदवार नाही. परिणामी ऋतुराज पाटील यांना समविचारी असलेल्या राष्ट्रवादीतूनही उमेदवारी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी आ. पाटील व राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ यांची दोस्ती उपयोगी पडणार आहे. कॉग्रेस-राष्ट्रवादीची रसद ऋतुराज यांना मिळेल, यासाठी आ. पाटील प्रयत्नशील आहेत.

कसबा बावडा कुणाच्या मागे?

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्‍ला समजला जातो. कसबा बावड्यातील मतदारही शिवसेनेला साथ देतो. कसबा बावड्यातील मतदार आ. सतेज पाटील यांना मानणारा असला तरी शिवसेनेचे आ. राजेश क्षीरसागर यांना मतदानात झुकते माप असते. परंतु, ऋतुराज यांच्या माध्यमातून खुद्द कसबा बावड्यातीलच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्यास येथील मतदार कुणाच्या मागे उभा राहणार, हे येणारा काळच ठरवेल.  ऋतुराज पाटील यांची उमेदवारी ग्राह्य धरूनच आता शिवसेनेकडून राजकारण होत आहे. त्यातूनच आ. क्षीरसागर यांनी शिवसेनेचे उमेदवार महापौर-उपमहापौरपदाच्या रिंगणात उतरविल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. 

भाजपचा उमेदवार गुलदस्त्यात...

विधानसभा निवडणुकीला वर्षाचा अवधी असला तरी आतापासूनच उमेदवारी आणि निवडणुकीची चर्चा सुरू आहे. गेल्यावेळी भाजपतर्फे  महेश जाधव रिंगणात होते. परंतु, आता त्यांना पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापनचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. गेल्यावेळी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविलेले सत्यजित कदम आता ताराराणी आघाडीचे महापालिकेतील गटनेता आहेत. ताराराणी आघाडीची भाजपबरोबर युती आहे. कदम हे कोणत्याही स्थितीत निवडणूक लढणार हे स्पष्ट आहे. त्यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कदम हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नातेवाईक आहेत. तसेच महाडिक गटाचे महापालिकेतील शिलेदारही आहेत. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमधून भाजपचा उमेदवार कोण असेल? हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार महाडिक हेच ठरवतील.