Wed, Jul 24, 2019 07:51होमपेज › Kolhapur › आपत्कालीन यंत्रणा सज्ज

आपत्कालीन यंत्रणा सज्ज

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 06 2018 12:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यास महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. मान्सून 2018 साठी महापालिका प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचा महापौर सौ. शोभा बोंद्रे यांनी मंगळवारी आढावा घेतला. यावेळी अधिकार्‍यांनी यंत्रणा तयार असल्याचे सांगितले. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या  नियोजनानुसार अधिकारी, कर्मचार्‍यांना नेमून दिलेली कामे तत्परतेने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. या कालावधीत अधिकारी व कर्मचारी यांनी आवश्यकतेशिवाय रजा घेऊ नये. सर्वांनी आपले फोन चोवीस तास सुरू ठेवावेत, असे आदेश महापौरांनी दिले. 

नालेसफाईनंतर नगरसेवकांचे पत्र आवश्यक

शहरातील बहुतांश नाल्यांची सफाई झाली असून उर्वरित नाले सफाई चार दिवसांत पूर्ण करण्यात यावी. नाले सफाईनंतर संबंधित प्रभागातील नगरसेवकांचे पत्र घ्यावे. नाल्यातील गाळ काठावर न ठेवता तातडीने शिफ्ट करावा. पावसाळ्यात अधिकार्‍यांनी मोबाईल बंद ठेवू नयेत. धोकादायक फांद्या तोडण्याचे काम तातडीने पूर्ण करावे. कर्मचार्‍यांना नियमित गणबूट घालण्याच्या सूचना आरोग्य निरीक्षकांना द्याव्यात. कर्मचारी गणबूट किंवा महापालिकेच्या वतीने देण्यात आलेले साहित्य वापरत नसेल तर संबंधित आरोग्य निरीक्षकास जबाबदार धरण्यात येईल. कर्मचार्‍यांना आवश्यक ते साहित्य तातडीने खरेदी करून देण्यात यावे, अशा सूचना आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी केल्या. 

फायर स्टेशनमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष

अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीधर पाटणकर यांनी बैठकीचा उद्देश सांगितला. यानंतर आरोग्य, पवडी, अग्‍निशमन या विभागांनी केलेल्या पूर्वतयारीची माहिती बैठकीत सांगितली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा 
मुख्य अग्‍निशमन अधिकारी रणजित चिले यांनी सांगितले की, रिलायन्स मॉलजवळील फायर स्टेशनमध्ये स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला आहे. कावळा नाका येथे कंट्रोल रूम सुसज्ज ठेवण्यात आली आहे. पावसाळ्यासाठी तीन स्कॉड तयार करण्यात आले असून, पूर बाधीत क्षेत्रात पाण्याच्या पातळीवर या स्कॉडकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. पूरबाधित क्षेत्रात लाईफ फ्लोरींग बोट आवश्यक त्या साधन सामुग्रीसह उपलब्ध करुन दिली जाणार आहे. 

यंत्रसामुग्री सज्ज,  तीन शिफ्टमध्ये काम

शहरातील पूर बाधीत होऊ शकतील अशा सखल भागांची यादी, तेथील लोकांना स्थलांतरित करण्यासाठी लागणारी तात्पुरत्या छावण्यांची ठिकाणे, नेमण्यात आलेला संपर्क अधिकारी याची माहिती दिली. धोकादायक इमारत उतरुन घेण्याबाबत जाहिर प्रसिध्दीकरण त्यांच्या नावांसह करण्यात आले आहे. सबंधीतांना नोटीसा दिलेल्या आहेत. पोलिसांनाही यादी देण्यात आलेली आहे.  या इमारती खाली करुन घेण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, असे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी सांगितले. 

आपत्तीचा व्यवस्थापनासाठी 8 जेसीबी, 12 डंपर, 2 बुम व इतर आवश्यक मशनरी सुसज्य ठेवण्यात आले आहेत. यावर्षी रात्रीच्यावेळी तातडीने मदत पोहचण्यासाठी वर्कशॉपमध्ये तीन शिफ्टमध्ये 1 जेसीबी, 1 डंपर व ड्रायव्हर तयार ठेवण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक यांनी स्पष्ट केले.काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, सभागृह नेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, नगरसेविका  पुजा नाईनकवरे,  रिना कांबळे, अ‍ॅड. सुरमंजिरी लाटकर  निलोफर अजरेकर यांनी सूचना केल्या. प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ.वनिता देठे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुरेखा शहा, प्रभाग समिती सभापती सौ.शोभा कवाळे, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर, एस.के.माने, आर.के.जाधव, हर्षजीत घाटगे  उपस्थित होते.

202 नाल्यांची सफाई पूर्ण...

मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील यांनी नाल्यांची तीन प्रकारे सफाई केली जात आहे. यात मनुष्यबळाद्वारे 476 छोटे नाले, जेसीबीच्या सहाय्याने 236 नाल्यांपैकी 202 नालेंची सफाई पूर्ण झाली असून, मोठे दोन नाले पोकलँडच्या सहाय्याने 13 किलोमीटरची सफाई करण्यात येत आहे, असे सांगितले. जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी पावसाळ्यात पाण्यासाठी आवश्यक असणार्‍या पावडरच्या डोसचा साठा करून ठेवला आहे. टँकरचे नियोजन केले आहे. शहरातील ड्रेनेजवरील खराब झालेले 46 ठिकाणचे मेन होल बदलण्यात आले आहेत, असे सांगितले.