Mon, May 20, 2019 22:04होमपेज › Kolhapur › अडाणी कोण?... शिक्षित की अल्पशिक्षित?

अडाणी कोण?... शिक्षित की अल्पशिक्षित?

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 29 2018 12:38AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

माणूस शिक्षणाने समृद्ध झाला की त्याला संकटाची जाणीव सर्वप्रथम येते आणि त्यावर उपाययोजनाही करण्यात तो तत्परतेने पुढे येतो, असा सार्वत्रिक समज असला तरी डेंग्यूने हा समज सध्या खोटा ठरविला आहे. राज्यात ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात तुलनेने शिक्षित समाज मोठा असला तरी एका सर्वेक्षणामध्ये राज्यातील डेंग्यूच्या प्रभावापैकी 74 टक्के प्रभाव शहरी भागात तर 26 टक्के प्रभाव ग्रामीण भागात असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे शिक्षित कोण आणि सुशिक्षित कोण, असा प्रश्‍न डेंग्यूनेच उभा केला असून आता शहरी भागातील शिक्षित नागरिकांना सुशिक्षित होऊन डेंग्यूचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. अन्यथा घरात पदवीधरांची संख्या असूनही केवळ निष्काळजीपणामुळे कुटुंबातील व्यक्‍ती डेंग्यूने गमावण्याची वेळ नागरिकांवर येऊ शकते.

डेंग्यूच्या मुकाबल्यासाठी काय करावयाचे आहे? खरे तर यासाठी काही फार मोठी साधन सामग्री, यंत्रणा आणि शस्त्रास्त्रांची आवश्यकता नाही. केवळ आपल्या घरात आणि घराभोवती असणारे स्वच्छ पाण्याचे साठे नष्ट केले तर यातील 50 टक्क्यांहून अधिक काम होऊ शकते. प्रत्येक कुटुंबाने जबाबदारीने हे काम केले तर बघता बघता शहरात एक व्यापक मोहीम उभी राहून डेंग्यूचे संकट मोठ्या प्रमाणात हद्दपार करता येऊ शकते. पण नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याने डेंग्यूचा डास चोरपावलाने घराघरात शिरतो आहे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी स्वच्छ पाण्याचे साठे नष्ट करण्याऐवजी डास विरोधक उदबत्त्या आणि तत्सम औषधांवर पैसे खर्च करण्यात ते धन्यता मानत आहेत. 

स्वच्छ पाण्याचे साठे नष्ट करणे हा डेंग्यूच्या संकटाची तीव्रता कमी करण्याचा जसा एक मोठा भाग आहे. तसे डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास त्या परिसरात जाऊन ताप रुग्णांचे सर्वेक्षण करणे आणि संबंधितांना तातडीने उपचार सुरू करणे हा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. तथापि, स्वच्छ पाण्याचे साठे नष्ट करण्यात जसे नागरिक निष्काळजी आहेत तसे डेंग्यूबाधित रुग्णांच्या सभोवताली असलेल्या परिसरातील ताप रुग्णांचे सर्वेक्षण करण्याच्या पातळीवरही कोल्हापुरात आनंदीआनंद आहे. 

शासकीय यंत्रणेच्या निकषानुसार दर 5 हजार लोकसंख्येसाठी एका बहुउद्देशीय आरोग्य कर्मचार्‍याची (एमपीडब्ल्यू) गरज असते. यानुसार कोल्हापूर शहरात सुमारे 120 कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. पण दुदैवाने कोल्हापूर महापालिकेकडे एमपीडब्ल्यू हा संवर्गच अस्थापनेत उपलब्ध नाही. या एमपीडब्ल्यूना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडे पाच हजार लोकसंख्येची जबाबदारी टाकली जाते. पण महापालिकेत असे कर्मचारी नसल्याने त्यांचे प्रशिक्षण तर सोडाच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय व्यवसायिकांना शासनाने डेंग्यूचे रुग्ण हाताळण्यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या खास निमंत्रितांना बोलावून प्रशिक्षण आयोजित केले तरी खासगी व्यवसायिकही प्रशिक्षणाला येत नाहीत, हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मात्र ही परिस्थिती तुलनेने चांगली राहण्यास शासनाचे 
एमपीडब्ल्यूचे जाळे उपयोगी ठरले आहे. त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिल्याने ताप रुग्णांचे सर्व्हेक्षण होते. रक्‍ताचे नमुने तपासले जातात आणि ग्रामीण भागातील नागरिक स्वच्छ पाण्याचे साठे स्वतःहून नष्ट करण्याबरोबर शासकीय यंत्रणेला सहकार्यही करतात म्हणून हे प्रमाण 24 टक्क्यांवर आणि बळींची संख्या नगण्य असे चित्र आहे. शहरात मात्र रोगाविषयी गांभीर्य नाही, स्वच्छ पाण्याचे साठे नष्ट करण्यात निष्काळजीपणा तर आहेच. पण त्याहीपेक्षा ताप रुग्णांच्या सर्वेक्षणासाठी शासकीय यंत्रणेतील कर्मचार्‍यांना गृहनिर्माण सोसायट्यांचे दरवाजेही उघडले जात नाहीत, यावरून डेंग्यूचे संकट आणि त्याच्या नागरिकांत असलेल्या गांभीर्याच्या अभावाची कल्पना येऊ शकते. हे गांभीर्य जोपर्यंत घेतले जाणार नाही तोपर्यंत डेंग्यूच्या डासाची हद्दपारी अशक्य आहे.