Sun, Mar 24, 2019 17:14होमपेज › Kolhapur › अनेकांना लाखोंचा गंडा घालणार्‍या प्रकाश पाटीलला अटक

अनेकांना लाखोंचा गंडा घालणार्‍या प्रकाश पाटीलला अटक

Published On: Aug 21 2018 8:01PM | Last Updated: Aug 21 2018 8:01PMइचलकरंजी: वार्ताहर 

सरकारी अधिकारी असल्याचे सांगून कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या भामटा प्रकाश कल्लेशा पाटील (रा. वसंतनगर सांगली) याला  पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे १५ लाख ८६ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सरकारी अधिकार्‍याचा हुद्दा वापरुन पाटील हा वर्तमानपत्रातील निधनाच्या बातम्या पाहून मृत व्यक्तीच्या घरी सहानुभूतीची पत्रे पाठवत असे. त्यातून त्याच्या मोबाईलजवर ज्या व्यक्ती संपर्क साधत त्यांच्याशी तो संबंध वाढवत होता. त्यानंतर तो सर्वांचा विश्‍वास संपादन करुन नोकरी तसेच कर्ज मंजूरीचे  आमिष दाखवून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आदी लंपास करीत असे.  स्थानिक गुन्हे शाखा, हातकणंगले पोलिस व संजयनगर पोलिसांच्या मदतीने पाटील याच्या घराची झडती घेतली असता फसवणूक करुन लुबाडलेले सोन्या-चांदीचे १८ तोळ्याचे दागिने, ८ मोबाईल, गुन्ह्यासाठी वापरलेले साहित्य, सरकारी अधिकार्‍याचा हुद्दा टाकून मयतांच्या नावे तयार केलेली पत्रे, विविध शासकीय शिक्के, स्टॅम्प पॅड, मृत व श्रध्दांजलीची पेपर कात्रणे, आंतरदेशीय पत्रे, पोस्टकार्ड, रजिस्टर एडी पावत्या, कोरे चेकबुक, सरकारी अधिकारी हुद्याची बनावट ओळखपत्रे, सुझुकी इर्टीगा असा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई हातकणंगले पोलिस ठाण्याचे निरिक्षक सीताराम डुबल, पोलिस उपनिरीक्षक शिल्पा यमगेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सतीश शिंदे, पोलिस उपनिरिक्षक अमोल माळी, महेश कोरे, वैभव दड्डीकर, ज्ञानेश्‍वर बांगर, विजय तळसकर, रणजित पाटील, राजू पट्टणकुडे, संजय फडतरे, सागर पाटील, रवी कोळी, जावेद रोटीवाले, फिरोज बेग, महेश खोत, अमर शिरढोणे, संजय इंगवले, अजिंक्य घाटगे, संदीप मळघणे आदींच्या पथकाने केली.