Thu, Jun 20, 2019 00:46होमपेज › Kolhapur › ‘प्रकाश’च्या कारनाम्यांनी पोलिसांच्याही डोळ्यांसमोर काजवे

‘प्रकाश’च्या कारनाम्यांनी पोलिसांच्याही डोळ्यांसमोर काजवे

Published On: Aug 24 2018 12:43AM | Last Updated: Aug 24 2018 12:14AMइचलकरंजी : बाबासो राजमाने 

शासकीय अधिकारी असल्याचे भासवत बेमालूमपणे अनेकांना गंडा घालणार्‍या सांगलीतील ठकसेन प्रकाश कल्लेशा पाटील याच्या फसवणुकीच्या फिल्मी स्टाईल फंड्यामुळे पोलिसही अचंबित झाले आहेत. पाटील याचे विविध जिल्ह्यांतील 8 गुन्हे सध्या उघडकीस आले आहेत. पाटील याच्याकडे जप्त केलेल्या साहित्यामध्ये त्याची डायरीही आढळून आली असून, त्यामध्ये त्याने 400 हून अधिक जणांना पत्रव्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती चांगलीच वाढत चालली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरपाठोपाठ नगर व इतर काही जिल्ह्यांमध्येही त्याने कारनामे केले असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

सांगलीतील वसंतनगर येथे राहणार्‍या प्रकाश पाटील या ठकसेनाच्या इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह हातकणंगले पोलिसांनी नुकत्याच मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस कोठडीत असलेल्या पाटील याच्याकडून गेल्या चार वर्षांत केलेले अनेक कारनामे उजेडात येत आहेत. प्रकाश पाटील याने पोलिस भरतीसाठीही प्रयत्न केले होते. त्यानंतर त्याने काही ठिकाणी रखवालदाराचेही काम केले आहे. त्याला निधन वार्ता वाचण्याची मोठी सवय होती. त्यातूनच उत्पन्न निर्माण करण्याचा नवा फंडा त्याला सुचला. इंटरनेटच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला चांगलेच बळ मिळाले. चार वर्षांपूर्वी त्याने सुरुवातीला आंतर्देशीय कार्डे मृतांच्या नातेवाईकांना पाठवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

त्यामध्ये काही ठिकाणी त्याला 100, 200 अशी तुटपुंजी रक्कम मिळाली. मात्र, या फसवणुकीच्या घटना पचल्याने त्याने पुन्हा मोठा हात मारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यातूनच शासकीय अधिकारी असल्याचा बडेजाव निर्माण केल्यास मोठे घबाड हाती लागणार असल्याने त्याने बनावट शिक्के, ओळखपत्र आदी मिळवण्यासाठी स्वत:कडे कॉम्प्युटर आणून प्रयत्न सुरू केले. त्यानंतर त्याने आंतर्देशिय कार्डांऐवजी मृतांच्या नातेवाईकांना लखोटा पाठवण्याचा सपाटाच लावला. या लखोट्यावर त्याने शासकीय अधिकार्‍याची मुद्रा छापण्याची नामी शक्कल शोधून काढली. त्यामुळे त्याचा मोठा प्रभाव समोरील व्यक्तीवर पडण्यास सुरुवात झाली आणि त्याला कमाईचे आणखीन एक नवीन साधनच मिळाले. यासाठी त्याने आणखीन प्रभाव पाडण्यासाठी भाड्याने मोटार घेऊन शासनाचा अंबर दिवा, त्याचबरोबर ‘महाराष्ट्र शासन’ नावाची पाटी वापरण्याचा फंडाही सुरू केला. हिंदी चित्रपट ‘स्पेशल छब्बीस’ला उजाळा देणार्‍या प्रकाश पाटील याच्या कारनाम्याला येथूनच प्रारंभ झाला. डोक्यावर टोपी, रूबाबदार कपडे, आलिशान गाडी, बहुरूपी पोलिस गार्ड अशा रूबाबात त्याने शासकीय अधिकारी भासवण्याचा प्रयत्न केला. यालाच अनेकजण बळी पडले.