Fri, Jul 19, 2019 07:26होमपेज › Kolhapur › आवाडे स्वगृही परतणार

आवाडे स्वगृही परतणार

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 03 2018 12:54AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या वादानंतर पक्षापासूनच दुरावलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता आहे. अलीकडेच आवाडे यांनी अखिल भारतीय काँगे्रसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्या बंगळूर येथील निवासस्थानी भेट घेतली. पक्षीय राजकारणात माजी खासदार कल्लाप्पा आवाडे व खर्गे यांची चांगली मैत्री आहे. अनेकदा आवाडे कुटुंबीयांची बाजू खर्गे यांनीच पक्षश्रेष्ठींकडे लावून धरली होती. त्यातूनच आजची ही भेट झाल्याचे समजते. 

काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षपदावरून 2010 साली पक्षाच्या कार्यालयात मोठा राडा झाला. पी. एन. पाटील विरुद्ध आवाडे असे या वादाचे स्वरूप होते. त्यावेळी जिल्हाध्यक्षपदासाठी माजी खासदार आवाडे रिंगणात होते; पण त्यांचा पराभव करून माजी आमदार संजय घाटगे यांची निवड झाली. यातून झालेल्या वादामुळे या निवडीला तत्कालीन प्रभारी मोहन प्रकाश यांनी स्थगिती दिली; पण त्यानंतर आवाडे मात्र पक्षापासून दुरावले होते. दोन महिन्यांपूर्वी हुपरीच्या जवाहर कारखान्यात झालेल्या कार्यक्रमातही प्रकाश आवाडे यांनी अप्रत्यक्षरीत्या जिल्हा नेतृत्वावर टीका करताना ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांच्याशी आघाडी करून राजकारण करण्याचा निर्णय जाहीर केला होता. 

त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही उमेदवारीवरून डावलले गेल्याने त्यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली जिल्हा ताराराणी आघाडीची स्थापना केली. त्यांचे पुत्र राहुल व आणखी एक सदस्य या आघाडीतून निवडून आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीतही अध्यक्षपदासाठी पी. एन. यांचे पुत्र राहूल यांचे नांव पुढे आल्यानंतर त्यांनी तीव्र विरोध करत विरोधी आघाडीला मदत केली. यावेळी त्यांची समजूत काढण्याचा काँगे्रसचे नेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. जिल्हा परिषदेतही ते स्वाभिमानीसोबतच आहेत. त्यांच्या आघाडीला आता महिला व बालकल्याण समितीचे सभापती मिळणार आहे. 

या पार्श्‍वभुमीवर पुन्हा आवाडे काँगे्रससोबत येतील का नाही याविषयी संभ्रमावस्था होती. पण आज त्यांनी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी खरगे यांची भेट घेतली. या भेटीत पश्‍चिम महाराष्ट्रासह जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. राजकीय घडामोडी, पक्ष संघटन, पक्ष मजबुती करून देण्यासह पक्षाचा झेंडा जिल्ह्यात पुन्हा डौलाने फडकवण्यावर चर्चा झाली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे होते, त्यांनीच या भेटीचे फोटो व चर्चेचा तपशील सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. अन्य उपस्थितांत कर्नाटकचे माजी ग्रामविकास मंत्री एच. के. पाटील, राजेश पाटील आदि उपस्थित होते.