Wed, May 22, 2019 16:57होमपेज › Kolhapur › नेट नाही तर ‘घरकूल’चे पैसे नाहीत

नेट नाही तर ‘घरकूल’चे पैसे नाहीत

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 12:39AMकोल्हापूर : विठ्ठल पाटील

पंतप्रधान घरकूल योजनेतून बांधलेल्या घरांचे छायाचित्र पाठविण्यासाठी नेट उपलब्ध नसल्याने डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना बिलाची रक्‍कम दिली जात नसल्याने संताप व्यक्‍त होत आहे. शासनाची एखादी महत्त्वाकांक्षी योजना अधिकारी आणि कर्मचार्‍यांतील उदासीनतेमुळे कशी घोळात अडकते याचे हे उदाहरण मानले जात आहे. नेटवर फोटो अपलोड झाल्याशिवाय बिल देता येत नसल्याचे ग्रामसेवकांकडून सांगितले जात असल्याने लाभार्थ्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

पंतप्रधान घरकूल योजनेतून ग्रामीण आणि डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना सुमारे दीड लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. तळागाळातील नागरिक घरापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने आणलेल्या या योजनेमुळे अनेकांना हक्‍काचे घर मिळत आहे. जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येक तालुक्यात या योजनेतून घरे बांधली गेली. स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद अनेक लाभार्थ्यांच्या चेहर्‍यावर झळकत असताना काहीजणांना मात्र बिलाची रक्‍कम मिळाली नसल्याने चिंतेने ग्रासले आहे. घर बांधण्यासाठी उसणे घेतलेले पैसे द्यायचे कसे हा त्यांच्यासमोर प्रश्‍न पडला आहे.

या योजनेतून घर बांधल्यानंतरच लाभार्थ्याला पूर्ण रक्‍कम दिली जाते. त्यामुळे अनेकजणांनी उसणे अथवा कर्जाऊ रक्‍कम घेऊनच घरे बांधली. डोंगराळ भागातील लाभार्थी बिल मिळण्यापासून वंचित राहत असल्याचे उदाहरण मांजरे (ता.शाहूवाडी) येथे घडले आहे. या गावात इंटरनेट उपलब्ध होत नसल्याने किंवा रेंज नसल्याने या योजनेतून बांधलेल्या घरांचे फोटो अपलोड करता येत नाहीत. जोपर्यंत घरासमोर लाभार्थ्यांसह मोबाईलवर घेतलेला फोटो थेट नेटवरून अपलोड होत नाही तोपर्यंत बिल दिले जाणार नसल्याचे ग्रामसेवक सांगत असल्याची लाभार्थ्यांची तक्रार आहे. याबाबत तालुक्याच्या अधिकार्‍यांचे लक्ष वेधूनही नेट उपलब्ध झाल्याशिवाय रक्‍कम मिळणार नसल्याचे सांगितल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत आले आहेत. 

घर बांधण्यासाठी उसणे अथवा कर्जाऊ घेतलेली रक्‍कम कशी परत द्यायची ही लाभार्थ्यांना चिंता आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने लक्ष घालून याबाबत तोडगा काढावा, अशी त्यांची मागणी आहे. मांजरेप्रमाणेच जिल्ह्यात इतरत्रही असे प्रकार घडले असतील तर संबंधित लाभार्थ्यांनाही घरकूल योजनेतून मंजूर झालेली रक्‍कम मिळणे आवश्यक आहे, अन्यथा शासनाच्या योजनेबाबत सर्वसामान्यांचा गैरसमज होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.

योजना चांगल्या; पण राबविणार्‍यांची अनास्था

सरकारच्या योजना चांगल्या; पण राबविणार्‍यांची अनास्था अनेकदा आड येत असल्याची अशी खंत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आजरा येथील एका कार्यक्रमात व्यक्‍त केली. त्याचाच अनुभव पंतप्रधान घरकूल योजनेतील लाभधारकांना येत आहे. बेघरांना निवारा देण्यासाठी पंतप्रधान घरकूल योजना प्रभावी ठरत आहे. या योजनेमुळे अनेकांचे घराचे स्वप्न साकार होत आहे. अत्यंत चांगली योजना म्हणून ग्रामीण भागातील गोरगरिबांतून सांगितले जात आहे; पण ठराविक अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या अनास्थेपायी लाभधारकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आल्याने संताप व्यक्‍त होत आहे. पालकमंत्री पाटील यांनी खंत व्यक्‍त केल्यानंतर तरी हे ठराविक अधिकारी आणि कर्मचारी शहाणे होतील अशी अपेक्षा लाभधारक व्यक्‍त करीत आहेत.