Tue, Apr 23, 2019 09:38होमपेज › Kolhapur › राष्ट्रीय खेळाडूकडून २० हजारांची लाच घेणारा डेप्युटी चिटणीस रंगेहाथ जेरबंद

राष्ट्रीय खेळाडूकडून २० हजारांची लाच घेणारा डेप्युटी चिटणीस रंगेहाथ जेरबंद

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 1:40AMकोल्हापूर : प्रतिनिधी

नेमबाजी खेळातील रायफलीचा परवाना मंजूर करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना जिल्हाधिकारी कार्यालयातील डेप्युटी चिटणीस प्रदीप शिवाजीराव कदम (वय 42, रा. कोंडेकर गल्‍ली, शिवाजी पेठ) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात रंगेहाथ पकडले.

तक्रारदार हे कोल्हापुरातील राष्ट्रीय नेमबाज खेळाडू आहेत. जिल्हास्तरापासून देशपातळीवर स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यात अनेक बक्षिसे पटकावली आहेत. झालेल्या बहुतांशी स्पर्धांसाठी खेळाडूने सहकारी मित्राकडून रायफली भाड्याने घेतल्या होत्या.

मार्च ते डिसेंबर या काळात देशभरात अनेक ठिकाणी नेमबाजीच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी स्वत:ची रायफल असणे बंधनकारक असल्याने रायफलीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडून परवाना घ्यावा लागतो. तक्रारदारांनी दि. 15 डिसेंबर 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात रीतसर अर्ज सादर केला होता. डेप्युटी चिटणीस कदम यांनी तक्रारदारांचा अर्ज निवासी जिल्हाधिकार्‍यांमार्फत करवीर प्रांताधिकार्‍यांकडे पाठवला होता.

करवीर प्रांताधिकार्‍यांनी अभिप्राय नोंदवून तो अर्ज अंतिम मंजुरीसाठी 12 जानेवारी 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता. हा अर्ज कदम यांच्याकडे गेला. कदम यांनी तक्रारदारास ‘मी तुमचे काम केले आहे. त्यापोटी 20 हजार रुपये घेऊन या आणि परवाना घेऊन जा’, असे सांगितले होते. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सापळा रचला होता. तक्रारदाराने सायंकाळच्या सुमाराला कार्यालयात कदम यांना 20 हजार रुपयांची रक्‍कम दिली. पथकाने छापा टाकून कदमला ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधात्मक पथकाने केलेल्या कारवाईमुळे अधिकारी, कर्मचार्‍यांत खळबळ उडाली होती. ‘एससीबी’चे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे, हवालदार श्रीधर सावंत, मनोज खोत, आबासो गुडणके, संदीप पावलेकर, रूपेश माने यांनी सहभाग घेतला.